जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२५ । जळगाव महापालिका निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीवर शेवटच्या दिवशी हरकतींचा पाऊस पडला. बुधवारी एकाच दिवसात तब्बल ३,०१५ हरकती दाखल झाल्या. यामुळे मनपाकडे प्राप्त एकूण हरकतींची संख्या १८,९४६ वर पोहोचली आहे. हरकतींच्या तपासणीसाठी प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे

प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबरपासून जाहीर झाली होती आणि हरकती नोंदवण्यासाठी १४ दिवसांची मुदत देण्यात आली होती. या १४ दिवसांमध्ये एकूण १८९४६ हरकती दाखल झाल्या. मनपाच्या १९ टीमने मंगळवारपर्यंत ६२०० हरकतींचा निपटारा केला आहे. सरासरी पाहिल्यास मनपा सध्या दिवसाला ४७६ हरकती निकाली काढत आहे. जर याच संथ गतीने काम झाले तर सहा दिवसांत केवळ २८५६ हरकतीच निकाली निघतील आणि तब्बल ९८९० हरकती तशाच राहतील. १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करायची असल्याने ९ डिसेंबरपर्यंत सर्व काम करण्यासाठी मनपाला आता रोज २१२४ हरकतींचा निपटारा करावा लागणार आहे. यामुळे मनपा कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पाच पटीने वाढणार आहे.

दरम्यान, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तातडीने महापालिकेने ५२ जणांची टीम नियुक्त केली आहे. निवडणुकीशी संबंधित यंत्रणेची आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी ३ डिसेंबर रोजी बैठक घेतली. प्रारूप यादीतील त्रुटींची संख्या मोठी असल्याने प्रशासनावर कामाचा प्रचंड ताण आला आहे. हरकती वेळेत निकाली काढता याव्यात यासाठी प्रशासनाने ५२ जणांची टीम मैदानात उतरविली आहे. एकेका पथकात २२ ते २५ जणांचा समावेश आहे.









