⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

आता पीएचडी करताना मिळणार महिन्याला १० हजार रुपये; विद्यापीठाची नवीन योजना

जळगाव लाईव्ह न्यूज| ६ऑगस्ट २०२३। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक प्रशाळांमध्ये संशोधन वाढीला लागावे यासाठी या प्रशाळांमध्ये पूर्ण वेळ पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सहयोगी अध्यापक योजना (टिचींग असोसिएटशिप प्रोग्राम- टॅप) सुरु करण्याचा निर्णय कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी घेतला आहे.

यापूर्वी संशोधनासाठी विविध वित्तीय एजन्सीकडून अर्थसहाय्य दिले जात होते. मात्र आता अर्थसहाय्य तुलनेने कमी दिले जाते. तसेच शिक्षकांची सेवानिवृत्ती, अध्यापक पदांच्या भरतीला असलेले निर्बंध यामुळे संशोधनावर परिणाम झाला आहे. हे संशोधन वाढीला लागावे व पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अध्यापन आणि संवाद कौशल्य वाढावे यासाठी सहयोगी अध्यापक योजना (टॅप) सुरु करण्यात आली आहे. यामध्ये प्रशाळांतील नोंदणीकृत आणि नियमित पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहय्य मिळेल तसेच प्रशाळांमध्ये गुणवत्तापूर्ण संशोधन वाढीला लागेल. या योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा १०हजार रुपये फेलोशिप दिली जाणार आहे. प्रारंभी एक वर्ष आणि जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल.

या योजनेसाठी ज्या अटी ठेवण्यात आल्या आहेत त्या मध्ये विद्यार्थी प्रशाळांमध्ये पुर्ण वेळ संशोधन करणारा असावा. त्या विद्यार्थ्याला कोणतेही शासकीय अथवा खाजगी संस्थेकडून फेलोशिप नसावी. या योजनेसाठी प्रशाळांमधील संशोधक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक प्रशाळांमधून दोन विद्यार्थ्यांची निवड या योजनेमध्ये केली जाणार आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा फेलोशिप प्राप्त झाल्यानंतरच्या काळात प्रतिष्ठीत शोध पत्रिकेत किमान एक शोध निबंध प्रसिध्द झालेला असावा. वेळोवेळी या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे अवलोकन केले जाणार आहे. या विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर वर्गांना शिकविणे गरजेचे राहील. कुलगुरु प्रा.व्ही. एल. माहेश्वरी यांच्या कल्पनेतून ही योजना साकारली असून यासाठी विद्यापीठाने अर्थसंकल्पात २० लाख रुपयांची तरतूद केली आहे.