जळगाव शहरातील काम न सुरु करणाऱ्या १० मक्तेदारांना बजाविल्या नोटीस
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव शहरातील रस्त्यांची दुरावस्था लक्षात घेवून डीपीडीसीतून ६१ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला होता. या निधीतून मंजुर झालेल्या कामांचे कार्यादेश देऊन देखील १० मक्तेदारांनी प्रत्यक्ष कामांना सुरुवात केलेली नाही, त्यामुळे सदर मक्तेदारांना मनपाच्या बांधकाम विभागामार्फत नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.
महानगरपालिकेला पालमंत्री गुलाबराव पाटील यांनी वेळो वेळी निधी दिला असून या निधीतून अनेक कामे मार्गी लागणार आहेत. ठराव, निविदा प्रक्रिया, मंजुरी अशा विविध प्रक्रियांमुळे बराच कालावधी गेला. त्यानंतर फेब्रुवारी व मार्च महिन्यात संबधित मक्तेदारांना कामांचे कार्यादेश देण्यात आले. असे कार्यादेश मिळाल्यानंतर संबधित मक्तेदारांनी कामे सुरु करणे अपेक्षित होते परंतु मक्तेदारांनी वेळेत कामे सुरु केली नसल्यामुळे ही कामे लांबणीवर पडली होती. कार्यादेश देऊन देखील मक्तेदार काम सुरु करत नसल्यामुळे मनपाच्या बांधकाम विभागामार्फत १० मक्तेरांना नोटीस बजाविण्यात आला आहेत. तसेच तातडीने काम सुरु न केल्यास संबधित मक्तेदाराविरुध्द कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.