जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कंत्राटी सहायक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबविण्यात आली असून, यात विद्यापीठ कायदा कलम १०३ चा भंग करण्यात आला असल्याचा आरोप डॉ. संजय भोकरडोळे यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी नुकतेच त्यांनी वकिलामार्फत कुलगुरूंसह नऊ जणांना नोटीस पाठविली आहे. त्यात पंधरा दिवसांच्या आत शैक्षणिक २०२१- २२ साठी केलेल्या कंत्राटी सहायक प्राध्यापकांच्या नेमणुका त्वरित रद्द कराव्यात व विद्यापीठ कायद्यानुसार भरती प्रक्रिया अवलंबून नेमणूक आदेश निर्गमित करून विद्यापीठाचे आर्थिक नुकसान थांबवावे, असे म्हटले आहे.
शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या केलेल्या व्यक्तींना पुन्हा बेकायदेशीर नेमणुका केल्या आहेत. त्या सर्व नेमणुका महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ चे कलम १०३ प्रमाणे करण्यात आलेल्या नाहीत, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. २५ ऑगस्ट २०२१ रोजी सोयीस्कर टिपणी सादर करून ती मंजूर करून घेण्यात आली. नंतर ५९ कंत्राटी सहायक प्राध्यापकांना नियुक्ती दिली; परंतु ही नियुक्ती विद्यापीठ कायद्यानुसार करण्यात आलेली नाही.
पी.एचडी. नसलेल्यांची नियुक्ती
पी.एचडी. नसलेल्या कंत्राटी सहायक प्राध्यापकांनाही बेकायदेशीररीत्या नियुक्त्या देण्यात आल्या असल्याचा आरोप नोटीसमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आता शैक्षणिक वर्ष २०२१ २२साठी केलेल्या कंत्राटी सहायक प्राध्यापकांच्या नेमणुका रद्द करण्यात याव्यात व विद्यापीठ कायद्यानुसार आदेश निर्गमित करून विद्यापीठाचे आर्थिक नुकसान थांबवावे, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
...अन्यथा फौजदारी कारवाई
भरती रद्द न केल्यास संगनमताने विद्यापीठासह समाजाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशा आशयाची नोटीस प्रभारी कुलगुरू, प्र-कुलगुरू, प्रभारी कुलसचिव, वित्त व लेखाधिकारी, उपकुलसचिव, प्रशासन विभाग कक्ष अधिकारी, वरिष्ठ सहायक (प्रशासन विभाग), तत्कालीन कुलसचिव (स्कूल ऑफ लाइफ सायन्स), उपकुलसचिव (विधी/माहितीचा अधिकार विभाग यांना पाठविण्यात आली आहे. यासंदर्भात प्रभारी कुलगुरू ई. वायुनंदन यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी एक ते दोन दिवसांत आपण विद्यापीठात येणार असून, या प्रकरणाची माहिती घेणार असल्याचे सांगितले.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..