जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२४ । प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टमध्ये त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यात आला. नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ असून ते आता रतन टाटा यांचा वारसा चालवणार आहेत.
रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असणार? याबाबत चर्चा सुरु होती; मात्र नोएल टाटा यांची निवड झाली. नोएल टाटा यांच्या नावावर पारसी समाजाने अगोदरच शिक्कामोर्तब केले होते. टाटा अडनाव असलेली व्यक्ती टाटा समूहाची उत्तराधिकारी असावी असा समाजाचा आग्रह होता. तर रतन टाटा यांनी मात्र टाटा अडनाव असलेली व्यक्तीच या पदावर असेल असे नाही, असे यापूर्वी स्पष्ट केले होते.
नोएल टाटा 40 वर्षांहून अधिक काळ टाटा समूहाचा भाग आहेत. त्यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे आता टाटा समूहाची जबाबदारी नोएल यांच्या खांद्यावर आली आहे. ते 100 देशांमध्ये पसरलेल्या टाटा समूहाच्या प्रचंड व्यापार साम्राज्याचे नेतृत्व करतील, ज्याची किंमत $403 अब्ज म्हणजेच 39 लाख कोटी रुपये आहे.