केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची ‘ही’ घोषणा ऐकून कार-बाईकस्वार झाले खुश.. आहे तरी काय?..
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२२ । सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहे. यामुळे वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. अशातच जर तुम्ही कोणतीही दुचाकी किंवा चारचाकी वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पहा. ही प्रतीक्षा तुम्हाला चांगले फायदे देईल. कारण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, एका वर्षात इलेक्ट्रिक दुचाकी, इलेक्ट्रिक तीनचाकी आणि इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांची किंमत पेट्रोल वाहनांच्या किमतीएवढी होईल
पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी होतील
पेट्रोल आणि डिझेलऐवजी पिकांच्या अवशेषांपासून इथेनॉल तयार करण्यावर मोदी सरकार भर देत असल्याचेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी होणार आहेत.नितीन गडकरी एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कारच्या किमतीच्या 35 ते 40 टक्के बॅटरीची किंमत असते
ते म्हणाले, ‘माझा प्रयत्न आहे की एका वर्षाच्या आत देशातील इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोलच्या वाहनांच्या बरोबरीने व्हावी. यामुळे जीवाश्म इंधन, पेट्रोल, डिझेल इत्यादींच्या किंमती कमी होतील आणि आपण परकीय चलन वाचवू शकू. सध्या बॅटरीच्या किमतीमुळे इलेक्ट्रिक वाहने महाग आहेत. कारच्या किमतीत 35 ते 40 टक्के बॅटरीवरच खर्च होतो.
सरकार हरित इंधनाला प्रोत्साहन देत आहे
हरित इंधनाला सरकार वेगाने प्रोत्साहन देत असल्याचेही केंद्रीय मंत्री म्हणाले. गडकरी म्हणाले की, जलमार्ग हे रस्त्यांपेक्षा स्वस्त वाहतुकीचे साधन आहे. यावर शासनाकडून वेगाने काम सुरू आहे.
दरम्यान,नितीन गडकरी आणि त्यांचे मंत्रालय वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी सतत काम करत आहेत. जामच्या समस्येतून सुटका करण्यासाठी नुकतीच गडकरींनी मोठी घोषणा केली होती. रस्त्यात चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचे छायाचित्र कोणी पाठवल्यास त्याला ५०० रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते. सरकार लवकरच तसा कायदा आणणार आहे.