⁠ 
शनिवार, मे 4, 2024

बिग ब्रेकिंग : राष्ट्रवादी महानगर जिल्हाध्यक्षांची लवकरच उचलबांगडी?

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत्या काही दिवसात अनेक मोठे बदल होणार असून यामुळे शहरातील राजकारणातील अनेक गणित बदलणार आहेत. अभिषेक शांताराम पाटील यांची जळगाव शहर महानगर जिल्हाध्यक्ष पदावरून लवकरच उचलबांगडी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीतील एका महत्त्वाच्या नेत्याने जळगाव लाईव्ह न्यूजसोबत बोलतांना दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अभिषेक पाटील यांचे भाजप नेत्यांसोबत तसेच गिरीश महाजन गटासोबत भागीदारी असल्याचे आरोप जाहीरपणे झाले होते. गेल्या आठवड्यात जामनेर येथील गाजत असलेल्या बीओटी तत्त्वावरील कॉम्प्लेक्स घोटाळ्यात ही भागीदारीचा विषय चर्चेचा आहे. याबाबत सोशल मीडियावरून उघडपणे पोस्ट व्हायरल होत असून देखील अभिषेक पाटलांनी कोणत्याही प्रकारचा खुलासा केला नव्हता. दरम्यान, राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी लवकरच याबाबत पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त करण्याची शक्यता आहे.

अभिषेक पाटील यांच्या विरोधात पक्षांतर्गत मोठ्याप्रमाणावर नाराजी असल्याची देखील चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी पक्ष कार्यालयात अभिषेक पाटील व काही पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार चकमक झाल्याचे देखील वृत्त आहे. याबाबत अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्टींकडे तक्रारी केल्याने त्याच्या पदावर गदा येणार असल्याचे कळते.

अशोक लाडवंजारी नवीन जिल्हाध्यक्ष?

अभिषेक पाटील यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याचे वृत्त असतांना त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे एकनिष्ठ – खंदे समर्थक अशोक लाडवंजारी यांना महानगर जिल्हाध्यक्ष पद दिले जाणार असल्याची माहिती आहे. याबाबत पक्षातील सर्व नेत्यांनी अनुकूलता दाखवली असून नेत्यांकडे याबाबत शिफारस देखील केली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.