जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२२ । शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठविण्याच्या निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयामुळे शिवसेनेतील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता दोन्ही गटाला धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर राजकीय वर्तृळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंनी (Eknath Khadse) प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले खडसे?
“बाळासाहेबांची वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली, हे अत्यंत क्लेशदायक… वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते मुलांनी एका मिनिटात गमावलं” असं खडसेंनी म्हटलं आहे. तसेच “आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली, ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली, ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर या महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज केली, महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांचे मुख्यमंत्री झाले ही, वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली. मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा.”
“वाड वडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते एका मिनिटामध्ये मुलांनी गमावलं. याला कोण जबाबदार आहे, कोण नाही हे तर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर समजेल. परंतू, तात्पुरता का होईना निवडणूक चिन्ह गोठवण हे अत्यंत दु:खद गोष्ट आणि क्लेशदायक” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांनीही दिली प्रतिक्रिया?
दरम्यान, धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवल्याच्या निर्णयांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली. धनुष्यबाण गोठवलं यांचं मला अजिबात आश्चर्य वाटतं नाही, हे होणारच याची मला खात्री होती .. अखेर तेच घडलं असं पवार म्हणाले. योग्य निर्णय दिले जातील याची आता खात्रीही नाही, असा टोला देखील पवारांनी यावेळी लगावला आहे. मी स्वतः वेगवेगळ्या चिन्हावर लढलो आहे. त्यामुळे चिन्हाचा जास्त काही फरक पडत नाही .. लोकच सर्व काही ठरवतात. चिन्ह असो वा नसो निवडणुकीला सामोरे जायची तयारी ठेवली पाहिजे असा सल्ला पवारांनी दिला.