जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जुलै २०२१ । गत काही दिवसात पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅसच्या दारात सातत्याने वाढ होत असल्याने वाढलेल्या महागाई विरोधात आज मुक्ताई नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ‘मोदी सरकार हो गई फेल… महंगा गॅस महंगा तेल’ ‘मोदी है तो महेंगाई है’ या गगनभेदी घोषणात गॅस सिलेंडर आणि वाहनांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभैया पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड रोहिणीताई खडसे, माजी आमदार अरुणदादा पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई चौधरी, युवक जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पाटील, किसान सेल जिल्हा अध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
यावेळी बोलतांना ॲड. रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, रोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य माणूस रडकुंडीला आला आहे. दळणवळणाच्या खर्चात वाढ झाल्याने सर्व वस्तू महागल्या आहेत. गॅस सिलेंडरचे दर दिवसागणिक वाढत आहेत ? सर्वसामान्यांना जगणे मुश्किल होऊ लागले आहे. आणि या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. या दरवाढीचा आम्ही निषेध करतो. लवकरात लवकर केंद्र सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करेल. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभैया यावेळी म्हणाले की, मोदी सरकारने केलेल्या दरवाढीमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले असून केंद्र सरकार दररोज भाववाढ करण्यात मश्गुल आहे आम्ही या भाववाढीचा निषेध करतो.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेवर खालच्या भाषेत अश्लाघ्य शब्दात टीका करणाऱ्या आ. गोपीचंद पडळकर यांचाही निषेध केला गेला.