नशिराबाद पोलिस स्थानक परिसरातील रस्त्याची दैना!
जळगाव लाईव्ह न्यूज । सुनिल महाजन । नशिराबाद पोलिस स्थानक परिसरातील रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. यामुळे परिसरातील प्रचंड नागरिक त्रस्त झाले असून येथील सामाजिक कार्यकर्ते व स्वयशोध फाऊंडेशनच्या वतीने याबाबत मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, मुख्याधिकारी यांनी पुढील काही दिवसात सदर समस्या सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले.
रस्त्यावर खड्डे पडून बांधकामाच्या आसार्या बाहेर आल्या आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना पायी चालताना व वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे एखादा अपघात, अनुचित प्रकार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पावसाळ्याचे वातावरण असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्या पाण्यात आसऱ्यांचा अंदाज येत नाही. रस्त्याची अशी अवस्था असताना नगरपरिषदेचे दुर्लक्ष असल्याने येथील काही सामाजिक कार्यकर्ते व स्वयशोध फाऊंडेशन यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांना निवेदन देऊन सदर बाब लक्षत आणून दिली. तसेच पुढील आठ दिवसात सदर समस्या सोडवावी असे अंगणी केली. व गावातील पिण्याचे पाणी, रस्ते, पथ दिवे, कचऱ्याच्या संदर्भात चर्चा केली. दरम्यान, मुख्याधिकारी यांनी पुढील काही दिवसात सदर समस्या सोडवण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी प्रा. डॉ विश्वनाथ महाजन, सामाजिक कार्यकर्ते हरीश पाटील, डॉ. प्रमोद आमोदकर, स्वयंशोध फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोलते, नरेंद्र धर्माधिकारी, सौरभ चौधरी, नीरज चितोडे हे उपस्थित होते.