नाशिकमध्ये पुन्हा दुर्घटना ; सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या बसलाही भीषण आग
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२२ । नाशिकमध्ये एका खासगी बसला आज पहाटे आग लागून एक मोठी दुर्घटना घडली. नाशिकमधील नांदूर नाक्याजवळील मिरची हॉटेल जवळ ही घटना घडलीय. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. दरम्यान, ही घटना ताजी असतांना नाशिकमध्ये सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या एसटी बसला अचानक भीषण आग लागली. ही बस गडावर भाविकांना घेऊन जात होती. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
आज पहाटे मिर्ची हॉटेल जवळ आयशर ट्रक आणि बसमध्ये जोरात धडक झाली. अपघातानंतर बसला भीषण आग लागली. या दुर्घटनेत 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 32 जखमींवर उपचार सुरू आहे. ही घडलेली दुर्दैवी घटना ताजी असतांनाच सप्तशृंगी गडावरील घटणेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी बारा वाजेच्या दरम्यान श्री सप्तशृंगी गड येथे ग्रामपंचायतच्या टोलनाक्याच्या जवळ महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस (बस क्रमांक एम एच 14 बीटी 3752)ला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. एसटी बस पिंपळगाव बसवंत डेपोची होती. प्रसंगावधान राखून चालक आणि वाहक यांनी सर्व 33 प्रवाशांना खाली उतरवले. सर्वांनी प्रसंगावधान राखून वेळीच उपाययोजना योग्य प्रकारे राबविल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमध्ये कुठल्याही भाविकाला अथवा कर्मचाऱ्याला कोणत्याही प्रकारे इजा झालेली नसून सर्व सुरक्षित आहेत.