⁠ 
रविवार, मे 5, 2024

तुम्हाला माहिती आहे का? कधी काळी नारायण राणे होते कट्टर शिवसैनिक!

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२१ । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे हे अचानक चर्चेचा विषय ठरले आहेत. नारायण राणे नेहमी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आले असून ते कधीकाळी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या मर्जीतील नेते आणि कट्टर शिवसैनिक होते.

कोण होते नारायण राणे
कोकणातील एका गावात नारायण तातू राणे यांचा जन्म 20 एप्रिल 1952 रोजी झाला. अवघ्या विशीत असताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या काळात तमाम कट्टर शिवसैनिकांपैकीच नारायण राणे हे एक होते. आक्रमक असलेल्या शिवसेनेत अल्पावधीतच ते पुढे आले आणि नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत मर्जीतील नेते म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

शिवसैनिक, शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री प्रवास
बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे असल्याने सुरुवातीला ते चेंबूरचे शाखाप्रमुख झाले. त्यानंतर 1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर नगरसेवक, ‘बेस्ट’चे अध्यक्ष आणि 1990 साली कणकवली-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत ते आमदार बनले. छगन भुजबळांनी 1991 साली सेना सोडली आणि विधिमंडळातल्या विरोधीपक्ष नेतेपदाची संधी आमदार राणेंकडे चालून आली. त्यानंतर शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये राणे महसूल मंत्री झाले. युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मनोहर जोशींना गैरव्यवहारांच्या आरोपांचा सामना करावा लागला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले. अवघ्या नऊ महिन्यांसाठी नारायण राणे मुख्यमंत्री बनले. ऐनवेळी बाळासाहेब ठाकरे यांनी दर्शविलेल्या विश्वासाच्या बळावर राणे यांनी मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पाडून घेतली.