गुन्हे

ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल नसल्याने १७ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल नसल्याच्या नैराश्येतून एका १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेडमधील नायगाव येथे घडली आहे.  बुद्धीशी पोटफोडे असा आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. जिल्ह्यात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल वा लॅपटॉप आवश्यक असल्याने गरीब कुटुंबातील मुलांची मोठी कोंडी झाली आहे. यातूनच नांदेडात एका १७ वर्षीय मुलीचा बळी गेला आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील मजूर असलेल्या प्रकाश पोटफोडे यांची हलाकीची स्थिती असल्याने ते त्यांच्या मुलीला मोबाइल घेऊन देऊ शकले नाहीत. त्यातून अकरावीत शिकणाऱ्या त्यांच्या मुलीने टोकाचे पाऊल उचलले. नायगाव शहरातील फुलेनगर वसाहतीत राहणाऱ्या बुद्धीशी पोटफोडे हिने नैराश्येतून घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

बुद्धीशी सध्या अकरावी इयत्तेत शिकत होती. तिला दहावीला ७५ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेतही चांगले गुण मिळवण्यासाठी ती जिद्दीने अभ्यास करत होती. मात्र, मोबाइल नसल्याने ऑनलाइन शिक्षणात अडथळा येत होता. याबाबत तिने आपल्या आई-वडिलांना सांगितले व मोबाइलची मागणी केली होती. मात्र, घरची स्थिती बेताची असल्याने लगेचच मोबाइल घेता आला नाही. घरच्यांनी तिला लवकरच मोबाइल घेऊ असे आश्वस्त केले होते. मात्र, पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने मोबाइल घेणं लांबणीवर पडत होतं. यातून नैराश्य आल्याने बुद्धीशीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. एका मोबाइलसाठी गुणवान मुलीचा बळी गेल्याने सगळेच हादरले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button