⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

रावेरच्या जागेवरून नाना पटोलेंचा एकनाथ खडसेंवर टोला ; म्हणाले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२४ । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका जाहीर करत खडसेंवर टोला लगावला आहे. रावेर लोकसभेची जागा जिंकण्याचं मेरिट हे काँग्रेसचं असून त्यामुळे ही जागा काँग्रेसच्याच वाट्याला येईल असं नाना पटोले म्हणाले.

कोण कुठे लढणार. रावेरमध्ये कोण लढणार याबाबतचा योग्य तो निर्णय हे वरिष्ठ घेतील. वरच्या पातळीवर कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे खाली कुणी काही बोलत असेल त्याला काही अर्थ नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी एकनाथ खडसे यांच्या रावेर लोकसभा निवडणूक लढण्याच्या इच्छेवर विरजण घातलं.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील हे सुद्धा ही जागा लढवण्याबाबत बोलू शकतात. मात्र आम्ही अशा पद्धतीचा आताताईपणा करत नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे. नाना पटोले हे जळगाव दौऱ्यावर असून यावेळी माध्यमांशी ते बोलत होते. तेव्हा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा नाना पटोले यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

मोदी सरकारला हद्दपार करायचंय
लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर असून अशातच जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप कुठपर्यंत आलं आहे? यावर नाना पटोले यांनी भाष्य केलं. जागा कुणाला कमी किंवा जास्त मिळतात.यापेक्षा तानाशाही प्रवृत्ती आणि लोकशाहीला न मानणाऱ्या भाजप सरकारला आम्हाला हद्दपार करायचं आहे. तसा आमचा निर्धार आहे. मोदी सरकारला हद्दपार करण्यासाठी आम्ही लढतोय, असं पटोले म्हणाले.