माझा भाऊ गटारीत पडला, मी काय उत्तर द्यावे : नगरसेवकाने विचारला जाब
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहरात अमृत योजना २.० योजनेचा टप्पा राबविण्यासाठी अद्याप डीपीआर तयार झालेला नसून त्यासाठी अंतीम मुदत ३१ ऑक्टोबर आहे. इथं आम्ही ५ लाखांचा विकास निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करतो आणि साधे गटारीचे स्लॅब कल्व्हर्ट टाकू शकत नाही. शासनाच्या कामांसाठी आणि निधीसाठी तुम्ही प्रयत्न करीत नाही. आज सकाळी माझा भाऊ देवी भवानी मंदिराचा पुजारी सकाळी गटारीत पडला, मला त्याने विचारणा केली. मी त्याला काय उत्तर द्यावे. आमची तळमळ तुम्हाला दिसत नाही का? प्रश्न नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी उपस्थित केला.
जळगाव शहर मनपाची महासभा शुक्रवार दि.७ रोजी महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित आहेत.
अमृत २ ची एकही गाईडलाईन पाळण्यात आलेली नाही. तसेच शासनाला पाठवले तर मंजुरी कशी मिळणार? असा प्रश्न शिवसेना जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी उपस्थित केला. संबंधित यंत्रणेला एक पत्र पाठवावे आणि ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत असून तोवर डीपीआर मागवावा अन्यथा पुढील कारवाईबाबत त्यांना कळवावे, अशी सूचना लढ्ढा यांनी केल्या. या विषयावर नगरसेविका ऍड.शुचिता हाडा, ऍड.दिलीप पोकळे, राजेंद्र घुगे-पाटील यांनी सहभाग घेतला.
अमृत योजना २.० च्या डीपीआरबाबत येत्या २ दिवसात बैठक घेऊन निर्णय घेण्याचे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.