जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । जिल्ह्यातील नावाजलेल्या मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड गुरुवारी जाहीर झाली. जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या सहकार कायद्यान्वये नोंदणी झालेल्या संचालक मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत १६ पैकी १४ संचालकांनी सर्वानुमते अध्यक्षपदी अॅड. विजय भास्करराव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी हेमंतकुमार साळुंखे यांची बिनविरोध निवड केली.
जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाची सन २०१५ मध्ये निवडणूक झाली होती त्यात २१ संचालक निवडून आले होते. अध्यक्षपदी माजी नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांची तर उपाध्यक्षपदी प्रा.डी.डी.बच्छाव यांची निवड झाली होती. सन २०१८ मध्ये अध्यक्ष पाटील यांचे निधन झाले. त्यानंतर उपाध्यक्ष बच्छाव यांनीही राजीनामा दिला होता. त्यामुळे या संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद रिक्त होते. या संचालक मंडळाचा सन २०२० मध्ये कालावधी पूर्ण झालेला आहे. मविप्र संस्थेची निवडणूक घेण्याबाबत जिल्हा उपनिबंधकांनी प्राधिकरणाकडून मार्गदर्शन मागविले होते.
जिल्हा उपनिबंधकस्तरावर ही निवडणूक घेण्याच्या सूचना प्राधिकरणाने १५ सप्टेंबर रोजी दिली होती. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सहकारी संस्थांची निवडणूक लांबणीवर पडलेली होती. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ३० सप्टेंबर रोजी संचालक मंडळाचा कालावधी संपलेल्या व जिल्हा निवडणूक आराखड्यातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक घेण्याचे आदेश दिले. मविप्रमुळे गेल्या काही वर्षांपासून पाटील व भोईटे गटात वाद सुरु आहेत.
भाजपच्या महान नेत्याने केले दुष्कृत्य
बहुजन समाजाच्या संस्थेत तत्कालीन मंत्रिमंडळातील व्यक्तीने हस्तक्षेप करुन निवडून आलेल्या संचालक मंडळाला बेदखल केले. नरेंद्र पाटील यांचा वारसा चालवत अॅड.पाटील व संचालकांनी खूप मोठा संघर्ष केला. संघर्षातून ही निवडणूक पार पडली. कायद्याचे राज्य आहे, परंतु संबंधितांचे ऐकत नसल्याच्या व्देषबुध्दीतून त्यावेळच्या एका भाजपच्या महान नेत्याने दुष्कृत्य केले. त्यामुळे संस्थेचे व विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्याला सर्वस्वी जबाबदार ते आहेत. बहुजन समाजाच्या संस्थेला संपवण्याचे षडयंत्र त्यांनी केले होते. त्याचे प्रायचित्त त्यांना मिळेल, अशी प्रतिक्रिया उपाध्यक्ष हेमंतकुमार साळुंखे यांनी दिली. मविप्रच्या सभासद व संचालक मंडळाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू, असे अॅड. पाटील यांनी सांगितले.
तिसऱ्या, चौथ्या टप्प्यात मविपची निवडणूक होणार
मविप्रच्या संचालक मंडळाचा कालावधी संपलेला आहे. जिल्हा सहकारी निवडणूक आराखड्यानुसार या संस्थेची निवडणूक तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात होणार आहे. फेब्रुवारी ते मार्च या कालावधी मविप्रची निवडणूक होवू शकते, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.