⁠ 
रविवार, मे 19, 2024

चाळीसगाव तालुका हादरला ; तरुणाचा जमिनीवर आपटत केला खून

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२३ । चाळीसगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून गॅरेजवरील काम करणाऱ्या तरुणाला जमिनीवर आपटून खून केल्याची घटना बहाळ येथे घडली. महेश संतोष बोरसे कुंभार (वय २४) असे मयत तरुणाचे नाव असून याबाबत याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला

नेमकी काय आहे घटना?
चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथे महेश संतोष बोरसे कुंभार हा आई, वडील, बहिण यांच्यासह वास्तव्यास आहे. त्याचे बस स्टॉपवरजवळ शिवशक्ती ऑटो गॅरेज असून शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी त्याने संशयित आरोपी ज्ञानेश्वर निंबा मासरे याची दुचाकी दुरुस्त करून दिली होती. मात्र दुचाकी परत खराब झाली.

त्यामुळे ज्ञानेश्वर मासरे याने शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मद्यधुंद होऊन त्याची दुचाकी परत शिवशक्ती गॅरेज मध्ये महेश बोरसे यांच्याकडे आणली. त्यावेळेला महेश बोरसे हा दुसऱ्या व्यक्तीची गाडी दुरुस्त करीत होता. त्याने संशयित आरोपी ज्ञानेश्वर मासरे याला, थोडं थांबा, ही गाडी झाल्यावर तुमची गाडी दुरुस्त करून देतो, असे सांगितले. मात्र त्याचा राग आल्यामुळे त्याने महेश बोरसे याला उचलले आणि जमिनीवर जोरात आपटले. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला.

तिथे उपस्थित त्याच्या वडिलांनी याचा जाब विचारला असता त्यांनाही संशयित आरोपीने शिवीगाळ केली. आजूबाजूच्या नागरिकांनी जखमी महेश बोरसे याला रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली. मेहुणबारे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली. तसेच रुग्णालयात जाऊन कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली. संशयित आरोपी ज्ञानेश्वर मासरे फरार झाला होता. पोलिसांनी तपास चक्र फिरवून रात्रीच त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत महेश बोरसे याचे पिता संतोष बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असून तपास सपोनी विष्णू आव्हाड करीत आहेत.