जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । महानगरपालिकेची परवानगी न घेता वाट्टेल तिथे बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध मनपा व पोलिस प्रशासनाने मोहीम उघडली आहे. शनिवारी शहरातील विविध भागातून १२५ अनधिकृत बॅनर हटवण्यात आले आहेत. रविवारी देखील मोहीम सुरू राहणार आहे.
उच्च न्यायालयाने शहर विद्रूपीकरण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चमकोगिरी करणाऱ्यांकडून थेट महापालिकेसमोर मोठे बॅनर लावण्यात येते. याशिवाय शहरातील मुख्य रस्त्यांवर दुभाजक, चौकात तसेच कॉर्नरला बॅनर लावून अपघातांना आमंत्रण देण्याचे प्रकार केले जातात. या विरुद्ध जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे व महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन विनापरवानगी बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
शनिवार व रविवारी महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत तसेच विनापरवानगी लावण्यात आलेले बॅनर काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जळगाव शहरात विविध मार्गांवरील १२५ बॅनर काढण्यात आले आहेत. रविवारी देखील ही मोहीम सुरू राहणार आहे. सोमवारपासून मनपाची परवानगी न घेता बॅनर आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पालिका व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई केली जाणार असल्याचे मनपाचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी सांगितले.
दुभाजकाच्या खांब्यावर लावलेले अनधिकृत फलक काढताना कर्मचारी.