जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची कानउघाडणी केली होती. त्यानंतरच लगेचच आज दुसऱ्या दिवशी राणे यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला.धुळ्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना अटकेपासून दोन आठवडे संरक्षण दिले आहे.
नारायण राणे यांच्यातर्फे जेष्ठ अॅड. सतीश माने शिंदे यांनी या प्रकरणात राणे विरोधात दाखल सर्व गुन्हे एकत्रित करून सुनावणीची मागणी केली. मात्र न्यायधीशांसमोर फक्त धुळे प्रकरणाचा अर्ज होता. म्हणून त्या संदर्भात नव्याने अर्ज करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. धुळ्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो गुन्हा रद्द करण्यासाठी व अंतरिम दिलासा मिळावा म्हणून नारायण राणे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली होती. त्यात मुंबई हायकोर्टाने नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे दोघे ही महत्वाच्या पदावर आहेत म्हणून त्यांनी हा वाद सामंजस्याने मिटवावा असा सल्ला कोर्टाने दिला होता.
मात्र धुळ्यामध्ये दाखल प्रकरणांमध्ये आज मुंबई हाय कोर्टात पुन्हा सुनावणी झाली. राज्य सरकारतर्फे राणेंविरोधात कारवाई न करण्यासंदर्भात काहीच ठोस आश्वासन देण्यात असमर्थता व्यक्त करण्यात आली. मात्र कोर्टाने नारायण राणे यांना दोन आठवड्याचा अंतिम दिलासा देत अटकेपासून संरक्षण दिलेले आहे. त्याचबरोबर त्यांना योग्य कायदेशीर मार्ग काढण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ?
भाजपनं गेल्या वर्षी सुरू केलेल्या जनआशीर्वाद यात्रेतील महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावर बोलताना, “मी असतो तर त्यांच्या कानशिलातच वाजवली असती” असे आक्षेपार्ह विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं. त्या वक्तव्यानंतर राज्यभरात तीव्र पदसाद उमटले आणि राणेंविरोधात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध केलेल्या त्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात धुळ्यासह पुणे, ठाणे, नाशिक, महाड, जळगाव आणि अहमदनगर पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 500, 505(2), 153 ब (1)(क) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.