⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जळगावात मालमत्ता खाली करण्यासाठी वापरला जातोय ‘मुळशी पॅटर्न’

जळगाव लाईव्ह न्यूज । 3 जून २०२२ । जळगाव शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असला तरी मूळ बाजारपेठेचा परिसर मात्र आजही मर्यादितच आहे. जुने जळगाव पूर्वी फार फार तर कोर्ट चौकापर्यंत मर्यादित होते. आज शहराचा ८ ते १० किलोमीटरचा विस्तार झाला असला तरी बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि इतर दळणवळण सुविधांच्या दृष्टीने टॉवर चौक ते भिलपूरा चौक हाच परिसर महत्वाचा मानला जातो. जळगावात मालमत्तांचे भाव गगनाला भिडत असून जुने भाडेकरू घर खाली करीत नसल्याने अनेकांच्या डोक्याला ताप होऊन बसला आहे. जळगावात मालमत्ता खाली करण्यासाठी ‘मुळशी पॅटर्न’चा उपयोग होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहे.

जळगाव शहरातील मुख्य बाजारपेठेचा परिसर म्हणजेच नवीपेठ, बळीराम पेठ, सुभाष चौक, सराफ बाजार, दाणा बाजार, तहसील कार्यालय परिसर हे प्राईम लोकेशन झाले आहेत. जळगाव शहरात सोयीसुविधा मुबलक मिळत नसल्या तरी मालमत्तांचे भाव मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. शहराचा विस्तार ठराविक परिसरातच झाला असल्याने देखील जागांचे भाव कमी अधिक आहेत. अलीकडच्या काळात एखाद्याने एखादी मालमत्ता किंवा मूळ मालकाकडून खरेदी केल्यावर खरा विषय असतो तो जुन्या भाडेकरूंना घर खाली करायला लावणे. एखाद्याने न्यायालयात दावा दाखल केलेला नसेल तर मग ती मालमत्ता रिकामी करण्यासाठी खरी खेळी सुरु होते.

शहरातील काही दिग्गजांनी काही वर्षांपूर्वी विशेषतः जागतिक मंदीच्या काळात २००७ ते २०१० दरम्यान अनेक मालमत्ता याच प्रकारे बळकावल्या होत्या. अजूनही अधूनमधून असे प्रकार कानी येत असतात. जळगाव शहरातील कधी काळी गाजलेला परिसर म्हणजे बळीराम पेठ. जळगाव शहरातील मनपा मालकीच्या व्यापारी संकुलांचा प्रश्न मार्गी लागत नसून ठोस तोडगा निघत नसल्याने व्यापाऱ्यांनी बळीरामपेठ परिसराकडे आपला मोर्चा वळविला. अवघ्या काही वर्षापूर्वी ५ हजार रुपये स्क्वेअर फूट असलेला जमिनीचा भाव आज ५० हजारांचा पलीकडे जाऊन पोहचला आहे. अनेकांनी आपल्या मालमत्ता विक्री करून दुसरीकडे बस्थान बसविण्यास सुरुवात केली आहे. बळीराम पेठेतील मालमत्ता विकायची, बक्कळ पैसे मिळवायचे, जळगावात चांगल्या परिसरात घर किंवा फ्लॅट घायचा आणि उर्वरित आयुष्य आरामात घालवायचे असे त्यांचे नियोजन असते.

हेही वाचा : Gangster Lawrence Bishnoi : देशातील सर्वात मोठा गँगस्टर, व्हाट्सअँपवर सुपारी, जेलमधून मर्डर, फेसबुकवर कबुलीनामा, ७०० शार्प शूटर, करोडोंचा मालक

बळीराम पेठ परिसर व्यापारी पेठ होत असला तरी आजही अनेक नागरिक आपले जुनेच घर सांभाळून आहेत. जुन्या मालमत्ता विक्रीसाठी अनेकांकडून आमिष दाखवली जातात. मोठमोठी रक्कम सांगितली जाते तरीही ते लोक इमारत विक्री करीत नाही. मालमत्ता खरेदी-विक्रीत तरबेज असलेले काही एजंट मात्र मूळ मालकाला गाठून काहीतरी लालूच दाखवतात. एखादा वयोवृद्ध मूळ मालक असल्यास त्याला भूलथापा देत मालमत्ता दुसऱ्याच्या नावे केली जाते. वृद्धाच्या मुलांना सर्व प्रकरण कळेपर्यंत फार उशीर झालेला असतो. काही ठिकाणी मूळ मालक मालमत्ता विक्री करतो मात्र जुने भाडेकरू खाली करण्याची जबाबदारी घेत नाही. जळगाव शहरात घरे खाली करून देणारे काही चेहरे प्रचलित आहेत. केव्हाही, कुठेही, कधीही धडक द्यायला अशी मंडळी तयारच असते.

कुणाकडून तरी सुपारी घ्यायची आणि घर खाली करण्यासाठी थेट घरावर धडक द्यायची हेच त्यांचे धंदे. साम, दाम, दंड, भेद हे सर्व उपाय वापरून मालमत्ता रिकाम्या करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असतात. घरे खाली करण्यासाठी एखादी रक्कम निश्चित केली जाते किंवा घर खरेदीच्या रकमेनुसार टक्केवारी ठरविण्यात येते. पोलीस ठाण्यापर्यंत देखील मालमत्तांचे वाद पोहचतात, अशा वेळी पोलिसांशीही हातमिळवणी करायची किंवा गुन्हे दाखल करण्याची खेळी खेळायची अशी कामे त्या गॅंगकडून केली जातात. जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत ठीक होते पण आता तर घरावर हल्ला करण्याइतपत मजल गेली आहे. मालमत्तेच्या प्रकरणात पोलीस सहसा लक्ष घालत नाही परंतु पोलिसांना हाताशी धरूनच काही वेळेस दमदाटीचे खेळ खेळले जातात.

जळगावात सुरु झालेले हे मुळशी पॅटर्न अद्याप तरी कुणाच्या जीवावर बेतलेले नाही परंतु हे असेच सुरु राहिले तर येणाऱ्या काळात एखाद्याचा जीव गेला तर त्यात नवल वाटू नये. पोलिसांनी वेळीच अशा प्रवृत्तीला आळा घालणे आवश्यक असून प्रामाणिक आणि सरळ मार्गाने चालणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून न्याय देणे आवश्यक आहे.