जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२६ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशातच एका भीषण अपघाताची घटना समोर आलीय. ज्यात भरधाव कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी मुक्ताईनगर ते भुसावळ रोडवरील हॉटेल महिंद्रा फाट्याजवळ घडली.

काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, एमपी 63 झेडए 6725 क्रमांकाची दुचाकी मुक्ताईनगरकडून भुसावळच्या दिशेने चुकीच्या बाजूने येत होती. या दुचाकीवर तीन जण स्वार होते. त्याचवेळी भुसावळकडून मुक्ताईनगरकडे येणारी एमएच 41 सी 5290 क्रमांकाची इनोवा कार भरधाव वेगाने येत होती. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला.

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघातातील जखमींना तात्काळ मुक्ताईनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाला होता. मयताची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे. उर्वरित दोन जखमींवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात या अपघातासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.







