murder : वाळू वाहतूकीच्या वादातून युवकाचा खून
जळगाव लाईव्ह न्यूज : १९ मार्च २०२२ : पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गावातील 40 वर्षीय वाळू व्यावसायीक युवकाचा कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना एरंडोल तालुक्यातील भातखंडेसह उत्राण परीसरात रविवारी सकाळी उघडकीस आली.
वाळू वाहतूकीच्या वादातून हा खून झाल्याची चर्चा आहे. सचिन उर्फ सोनू देविदास पाटील (40, अंतुर्ली नं.3, ता.पाचोरा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पाचोरा तालुक्यांतील अंतुर्ली नं.3 येथील रहिवासी सचिन पाटील हा तरुण खाजगी व्यावसायीक होता मात्र या तरुणाचा एरंडोल तालुक्यातील भातखंडे आणि उत्राण परीसरात मध्यरात्री अज्ञात मारेकर्यांनी धारदार वस्तूने वार करीत खून केला. ही बाब रविवारी सकाळी समोर आली.
आरोपींनी खुनाची घटना दडपण्यासाठी तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केल्याचीही प्राथमिक माहिती आहे. कासोदा पोलिसांनी घटनस्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. पुढील कारवाईसाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. नेमका हा खून करण्यामागचे ठोस कारण जरी समोर आले नसलेतरी वाळू वाहतुकीतील स्पर्धा व वादातून हा खून झाल्याची चर्चा आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील, कासोदा निरीक्षक निता कायदे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.