⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

महावितरणची धडक मोहीम : जिल्ह्यात काढले ३ हजारांवर आकोडे

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । आकडेबहाद्दरांवर कारवाईसाठी महावितरण जळगाव परिमंडलाने २१ एप्रिलपासून धडक मोहीम हाती घेतली असून, हजारो आकडे काढून केबल जप्त केल्या आहेत. या प्रयत्नांमुळे यंत्रणेवरील ताण कमी होऊन् आर्थिक भार हलका होण्यास मदत होणार आहे. आता तीन हजाराहून अधिक आकड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यापासून महावितरणची मागणी २४५०० मेगावॅटच्या पुढे गेली आहे. तसेच ही मागणी टिकून आहे. उलट यात वाढच होत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही महाराष्ट्र शासन व महावितरण कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र ही परिस्थिती सबंध देशात असल्याने वीज मिळणेही अवघड झाले आहे. खुल्या बाजारात विजेचे दर १२ रुपयांपर्यंत आहेत. ही महागडी वीज घ्यायची तर त्याचा बोजा पुन्हा ग्राहकांवर येणार. ती कमीत कमी घेता यावी याकरिता यंत्रणेवरील अनधिकृत भार कमी करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत. आकडे बहाद्दरांवर कारवाई करताना ज्या ११ केव्ही वीज वाहिन्यांचा करंट १०० ॲम्पीअरच्या पुढे आहे अशा वाहिन्यांवर गुरुवारी सकाळपासूनच धडक मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये अनधिकृतपणे जोडलेले कृषिपंप, त्याचे केबल, स्टार्टर आदी जप्त केले जात आहे. घरगुती व इतर ग्राहकांचे आकडेही काढले जात आहेत. या कामात वरिष्ठ अभियंत्यापासून तंत्रज्ञ, यंत्रचालक, कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

या मोहिमेत २१ ते २४ एप्रिलपर्यंत जळगाव परिमंडलात दोनशेहून अधिक वीज वाहिन्यांवर आकडे काढण्याची व वीजचोरी पकडण्याची मोहीम राबवण्यात आली. यामध्ये जळगाव जिल्ह्यात १४५७, धुळे जिल्ह्यात ९४७ तर नंदुरबार जिल्ह्यात ७७६ आकडे काढण्यात आले. तर ५९ प्रकरणात वीजचोरीची कारवाई करण्यात आली. या अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याने वीज वाहिन्यांवरील भारही कमी झाला. त्यामुळे जळगाव परिमंडलात या वाहिन्यांवर २१ एप्रिल रोजी ७७.२२ एमडब्ल्यू, २२ एप्रिल रोजी ६२.०५ एमडब्ल्यू,२३ एप्रिल रोजी ३७.१२ एमडब्ल्यू तर २४ एप्रिल रोजी १७.३१ एमडब्ल्यू भार कमी झाला.