जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा, जळगावची मानसी पाटील राज्यात प्रथम
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२१ । राज्य सरकारतर्फे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता आरक्षीत असलेली पदे अराखीव (खुल्या) पदांमध्ये रुपांतरीत करण्यात आली असून एमपीएससीतर्फे नव्याने सुधारित निकाल जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून मानसी पाटील या महिला वर्गातून राज्यात प्रथम आल्या आहेत.
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक ३१२३/२०२० प्रकरणी दिनांक ५ मे, २०२१ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने शासनाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचनानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता आरक्षीत असलेली पदे अराखीव (खुल्या) पदांमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहेत. त्यानुसार एमपीएससी परीक्षेच्या एकूण ४२० पदांचा सुधारित अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १३ ते १५ जुलै २०१९ या कालावधीत राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ घेण्यात आली होती. सुधारित अंतिम निकाल संबंधित उमेदवारांनी अर्जात केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता शासन स्तरावर मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून दिनांक २८ सप्टेंबर, २०१९ रोजी जाहीर करण्यात आला होता.
उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर नुकतेच प्रसिध्द करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षेमध्ये प्रसाद बसवेश्वर चौघुले हे राज्यातून सर्वसाधारण वर्गवारीमधून पहिले आले आहेत. रोहन रघुनाथ कुवर हे मागास वर्गवारीमधून प्रथम आले आहेत. तसेच महिला वर्गवारीतून मानसी सुरेश पाटील या राज्यात प्रथम आल्या आहेत.
मानसी पाटील यांच्या यशाने जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जळगाव जिल्ह्यातील इतर काही उमेदवारांना देखील सुधारित निकालानुसार उपजिल्हाधिकारी पदी संधी मिळणार आहे.