जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 14 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलल्यानं जळगावात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या संतप्त विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहेत. यावेळी 250 ते 300 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे येथील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
यावेळी संतप्त उमेदवारांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. एमपीएससी आमच्या हक्काची…नाही कुणाच्या बापाची अशा प्रकारच्या घोषणाबाजी यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या आहे. तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षा झालीच पाहिजे, अशीही मागणी करण्यात आलीय.
राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्शवभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेबाबत लोकसेवा आयोगाच्या परिपत्रकात काही सांगण्यात आलेले नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. राज्य शासनानं परीक्षा पुढे ढकलल्यानं विद्यार्थ्यामंध्ये संतापाचं वातावरण आहे. 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती.