रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी चोपडा तालुक्यात वादळी – पावसात नुकसान झालेल्या बाबींचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन केले होते.
सदर आढावा बैठकीत तहसीलदार अनिल गावीत, गटविकास अधिकारी बी एस कोसोदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ मनोज पाटील, न प मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, महावितरणचे गायकवाड यांसह सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीत खा रक्षा खडसे यांनी तालुक्याचे तहसीलदार अनिल गावीत यांना अवैध वाळू वाहतूक प्रश्नी कडक शब्दांत सुनावले . त्यात विना टेंडर वाळूचे एकही ट्रॅक्टर चालता कामा नये, विना टेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी मग ते ट्रॅक्टर कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी किंवा नेते किंवा कार्यकर्त्यांचे असोत. सर्वांना समान न्यायाने वागणूक दिली पाहिजे. रेतीचे भाव 3 ते ४००० रुपये ट्राली जर असेल तर सर्वसामान्य माणूस कसा काय घेईल असा प्रश्न रक्षा खडसे यांनी उपस्थित केला होता.घरकुल मंजूर घरांना रेती मिळालीच पाहिजे व चोपडा तालुक्यातील अवैध रेती कायम बंद झाली पाहिजे अशी अपेक्षा खा रक्षा खडसे यांनी व्यक्त केली आहे.
खा रक्षा खडसे यांना उपस्थित शेतकऱ्यांनी निवेदन दिले, त्यात त्यांनी मागील वर्षाचे पीक विम्याचे पैसे अजूनही मिळाले नसल्याचे खंत व्यक्त केली . केळी पीक विम्याचे निकष हे जुन्या पद्धतीचे असावेत.वादळ , वारा , गारपीट अश्या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे .पिक विम्याचे निकष बदलल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहिले आहेत .ज्या शेतकऱ्यांनी पिक विमे काढले आहेत त्यांचे खूपच नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले .ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला नाही अश्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० ते ६० हजार रुपये मदत मिळायला हवी.
तसेच वादळात विजेचे खांब काही ठिकाणी कोलमडले आहेत तरी त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी , काही ठिकाणी शेतकऱ्यांना डीपीची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे .तसेच शेतकऱ्यांना बिलासाठी अडवणूक न करता किंवा दोन बिले भरण्याचा अट्टाहास राज्यशासनाने करू नये व शेतकऱ्यांना एक बिल भरण्याची मुभा द्यावी किंवा बिले टप्प्याने भरण्याची सुविधा दिली पाहिजे .
खा रक्षा खडसे यांनी आपल्या चोपडा तालुका नारोद या गावी भेटी देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या .तसेच मराठा आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणला धक्का लागता कामा नये म्हणून त्या संदर्भाचे निवेदन तहसीलदार अनिल गावीत यांना दिले आहे.
खा रक्षा खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश संदर्भात विचारले असता त्यांनी जोपर्यंत मी स्वतःहून अधिकृतपणे सांगत नाही , तोपर्यंत सर्व बाबी निरर्थक व केवळ अफवाच आहेत. मी भारतीय जनता पक्षात आहे आणि यापुढेही भारतीय जनता पक्षातच राहील.जरी नाथाभाऊ राष्ट्रवादीत असले तरी त्यांनी मला कधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशासाठी आग्रह आणि जबरदस्ती पण नाह . राजकीय जीवनात नाथाभाऊची शिकवण माझ्यासाठी खूप मोलाची असल्याचे सांगितले.
चोपडा शहर व तालुक्यातील रुग्णांना कोविड काळात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे पत्रकार सचिन जैस्वाल व आर डी पाटील यांनी या संदर्भात विचारले असता त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक याना भ्रमणध्वनी वरून तात्काळ माहिती घेतली व सदर हॉस्पिटलवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असेही सांगितले.
आढावा बैठकीनन्तर कोरोना काळात ज्यांनी कोविड योद्धा म्हणून काम केले त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.