⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | कृषी | क्यो की सास भी कभी बहू थी… सासू-सुनेच्या रणसंग्रामामुळे दूध संघाच्या निवडणुकीत रंगत

क्यो की सास भी कभी बहू थी… सासू-सुनेच्या रणसंग्रामामुळे दूध संघाच्या निवडणुकीत रंगत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | ६ डिसेंबर २०२२ | राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईमुळे जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. १० डिसेंबर रोज दूध संघासाठी मतदान होत असून प्रचाराची रणधुमाळी पुन्हा सुरू झाली आहे. आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या निवडणुकीकडे राजकीय वर्चस्वाची रंगीत तालिम म्हणून पाहिले जात आहे. या निवडणुकीतील सर्वच आरोप प्रत्यारोपांची चर्चा होतेच मात्र सर्वाधिक चर्चा आहे ती, सासू-सूनेच्या राजकीय रणसंग्रामाची!

दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनाच्या महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आहे, तर गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे गटप्रणीत शेतकरी पॅनलमध्ये थेट लढत होत आहे. सासरे एकनाथराव खडसे व सासू मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात सून भाजपाच्या खासदार रक्षा खडसे प्रचार करत असल्याने सासू-सूनेच्या या वर्चस्वाच्या लढाईने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. मुक्ताईनगर मतदारसंघात शेतकरी पॅनलच्या झालेल्या मेळाव्यात खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, की शेतकर्‍यांना मजबूत करायचे असेल, तर एक चांगले व्यवस्थापन जिल्हा दूध संघावर देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी विकास पॅनलला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

रक्षाताईंमुळे मला जास्त बोलता येत नाही : आमदार मंगेश चव्हाण

मुक्ताईनगरच्या मेळाव्यात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी याच व्यासपीठावरून रक्षा खडसेंचे कौतूक करत एकनाथराव खडसे यांच्यावर टीका केली. काही लोकांमध्ये मी पणाची भावना होती. आता ती टिकून राहिली नाही. मी पणाच्या भावनेमुळेच त्यांना पक्षातून जावं लागलं. आता जिथे गेले आहात. तेथील लोकांना सांभाळा. त्या पक्षाच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की, ते आमच्याकडे आल्याने आमचा ताण वाढला. रक्षाताई इथे असल्याने मला जास्त बोलता येत नाही. एकनाथ खडसेंच्या घरात रक्षाताई सारख्या पवित्र गृहिणी आहेत. त्यामुळे खडसे चुकीचे काम करत असूनही उतरता काळात खडसे यांना चांगले दिवस आहेत, असा टोला आ. चव्हाण यांनी लगावला.

आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीची रंगीत तालीम

दूध संघात एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. राज्यात सत्तातंर झाल्यानंतर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यात आले. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्य प्रशासक म्हणून काम हाती घेतल्यानंतर खडसे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने प्रशासक मंडळ अवैध ठरवित संचालक मंडळाकडेच कारभार दिला. प्रशासकपदाचा कारभार हाताशी असताना मंगेश चव्हाण यांनी संघातील माहिती घेऊन संघात अखाद्य तूप व्यवहारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पोलिसात फिर्याद दाखल केली. तेंव्हापासून ही निवडणूक रंगली आहे. जिल्हा दूध संघात ४४३ मतदार आहेत. मतदार कमी असले तरी संपूर्ण जिल्ह्यातून मतदान आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीची ही रंगीत तालीम मानली जात आहे.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.