जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे कोरोनाच्या काळात संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेने सामान्य डब्यांचेही आरक्षित श्रेणीत रूपांतर केले होते. आता परिस्थिती पुन्हा सामान्य झाल्यावर जनरल डबे सुरू केले जात आहेत. रेल्वेने शेकडो लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सामान्य डब्यांचे अनारक्षित डब्यांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अशा गाड्यांची संपूर्ण यादी प्रसिद्ध केली आहे.
त्यामुळे आता तब्बल अडीच वर्षांनंतर जनरल डब्यांसाठी आरक्षित तिकीट काढण्याची गरज भासणार नाही. उत्तर रेल्वेने ट्विट करून ट्रेनची संपूर्ण यादी जाहीर केली आहे ज्यात सामान्य डबे अनारक्षित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर फेब्रुवारीच्या अखेरीसच जनरल डब्यांमध्ये जुनी यंत्रणा पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. आगाऊ आरक्षणाचा कालावधी संपल्यानंतरच प्रवाशांना जनरल डब्यातून सामान्य तिकिटांवर प्रवास करता येईल, असे रेल्वेने त्यावेळी सांगितले होते.
कोरोनाच्या काळात प्रवाशांना संसर्गापासून वाचवण्यासाठी सामान्य डबे देखील आरक्षित करण्यात आले होते. तेव्हापासून प्रवाशांना या डब्यातून प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षण करावे लागत होते. उत्तर रेल्वेने ज्या गाड्यांमधील सर्वसाधारण डबे आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या गाड्यांमध्ये आता प्रवाशांना ठरलेल्या तारखेपासून सामान्य तिकीट घेऊन प्रवास करता येणार आहे. साथीच्या आजारापूर्वीच्या व्यवस्थेप्रमाणेच आता प्रवाशांना द्वितीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास करण्यासाठी स्थानकावर जाऊन सामान्य रेल्वे तिकीट खरेदी करता येणार आहे.