⁠ 
सोमवार, मे 6, 2024

मुक्ताईनगर तहसील कार्यलयावर रविवारी मागासवर्गीयांचा मोर्चा

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयावर रविवार दि.२० मार्च रोजी मागासवर्गीय जाती, जमाती, ओबीसी, भटक्या-विमुक्तांच्या न्याय मागण्यांसाठी व स्वतंत्र प्रजासत्ताक भारतात घटनात्मक तरतुदीत अपूर्ण राहिलेल्या सर्व प्रकारच्या अनुशेषाची पूर्तता करण्याकडे केंद्र तथा राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मागासवर्गीय संवैधानिक संघर्ष समिती’च्या वतीने या मोर्चा आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या ७२ वर्षात प्रजासत्ताक भारताने पारित केलेल्या मागास वर्गीय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती भटके-विमुक्त आणि इतर मागासवर्गीय/ओबीसी जातींसाठी कायद्याने ठरवून दिलेल्या आर्थिक तरतूदीन पासून ते नोकरी भरती आणि पेन्शन अदायगीच्या धोरणात शासनाने सुरू केलेली धरसोड कायमची थांबविण्यासाठी व लवकर यातील अनुशेष आणि शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या असलेल्या शैक्षणिक सवलती पासून ते स्कॉलरशिप पर्यंतच्या योजना निकोपपणे राबविण्यात आल्या नसल्याने, आजही देशात निकोप शिक्षणाचा अभाव बेरोजगारी च्या समस्या तशाच आहे. सरकारी उपक्रम व उद्योगांचे खाजगीकरणाच्या नावाखाली, भाडोत्री सायकली प्रमाणे देश चालवणे ची संकल्पना भारताच्या “जगा आणि जगू द्या ” या मूलभूत धोरणाच्या जीवावर बेतली आहे. आजही देशात अन्न,वस्त्र,निवार्याच्या मूलभूत योजना निकोप व पूर्णपणे राबविण्यात आलेल्या नाही.म्हणून झोपडपट्टया व बेघरांची संख्या मोठी आहे.

या विविध मागण्यांसाठी ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती भटके-विमुक्त जाती-जमातीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच नागरिक भावा, बहिणींनी या मोर्चाकडे आपलेपणाने लक्ष देऊन, आपल्या भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षान्चे जतन करण्यात मोर्चात आपला सहभाग नोंदवा, असे आवाहन मागासवर्गीय संवैधानिक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष एड.मनोहर खैरनार व संघटनेचे तालुका अध्यक्ष आर.एन. पोहेकर (सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक) यांनी केले आहे. रविवार दि. २० मार्च २०२२ रोजी सकाळी ११ – ०० वाजता मुक्ताईनगर शहरातील एस.एम. कॉलेज परिसरापासून प्रवर्तन चौक ते आयसीआयसीआय बँक ते तहसील कार्यालय रोड असा मार्गक्रमण करणार आहे. व मुक्ताईनगर चे तहसीलदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देणार आहे.