⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

स्थानिक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जळगाव लाईव्ह न्यूज। २६ एप्रिल २०२२ । येथील समता नगरातील रहिवाशांच्या स्थानिक मागण्यांसाठी रिपाइंचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तसेच ठिय्या आंदोलन देखील करण्यात येऊन निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील समता नगरात गेल्या अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधा नसल्याने प्रशासनाकडे वारंवार तक्रारी देवूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मंगळवार २६ एप्रिल रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येवून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्या देखील करण्यात आल्या. यात समता नगरात राहणाऱ्या रहिवाशांना सातबारा उतारा देऊन जागा कायमस्वरूपी नावावर करून द्यावी, समतानगर येथील लाईट गेल्या दोन महिन्यांपासून नसून तेथील रहिवाशांना अंधारात राहावे लागत आहे, महावितरणने याकडे दुर्लक्ष केले आहे तरी येथील रहिवाशांना कायमस्वरूपी वीजमीटर देण्यात यावे, समता नगर परिसरात स्वच्छता अभाव असून दररोज व वेळेवर स्वच्छता करण्यात यावे, समता नगरात गोरगरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी महापालिका यांनी शाळा सुरु करावे, समता नगर येथे येण्याकरिता मुख्य रस्ता नसून मुख्य रस्त्यांची निर्मिती महानगरपालिकेने करावे अशा विविध मागण्यांसंदर्भात समतानगर भागातील रहिवाशांनी हा मोर्चा काढला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा यावेळी घेण्यात आला.