गुरूवार, जून 8, 2023

खुशखबर.! पुढच्या २४ तासांत मान्सून अंदमानात धडकणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२३ । राज्यात सध्या सूर्य आग ओकत आहे. वाढत्या तापमानाने नागरिक घामाघूम झाले आहे. शेतकऱ्यांसह नागरिक मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. देशात मान्सून कधी दाखल होणार? असा प्रश्न देशवासीयांना पडला आहे. याच दरम्यान एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

बंगालच्या उपसागरातील ‘मोचा’ चक्रीवादळ निवळल्यानंतर अंदमान, निकोबार बेट समुहावर नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल होण्यास पोषक हवामान झाले आहे. उद्यापर्यंत (ता. २०) मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दीर्घकालीन आगमनाच्या वेळेनुसार मॉन्सून साधारणत: २१ मेपर्यंत अंदमानाची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे पोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो. तर १ जूनपर्यंत केरळमध्ये मॉन्सून डेरेदाखल होतो.मात्र, यंदा २० मेपर्यंत मॉन्सून अदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

गतवर्षी १६ मे रोजी मॉन्सूनने अंदमान बेटांचा बहुतांशी भाग व्यापला होता. तर २९ मे रोजी केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून १० जून महाराष्ट्राच्या तळकोकणात दाखल झाला होता.