जळगाव लाईव्ह न्युज : १५ मे २०२४ : यंदाचा मान्सून पाऊस चांगला होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र मान्सून भारतात कधी दाखल होईल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. यातच भारतीय हवामान खात्याने मान्सून केरळमध्ये कधी दाखल याची तारीख जाहीर केली आहे. नैऋत्य मान्सून केरळात 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना चांगला दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
यंदा 19 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होण्याचा अंदाज आयएमडीकडून व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर पुढील 10 दिवसांत मान्सून केरळमध्ये येणार आहे. म्हणजेच यंदा 31 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहचणार आहे. मान्सून केरळमध्ये आल्यावर त्याची महाराष्ट्राकडे वाटचाल सुरु होते. केरळमधून पुढील 4 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे.
मागील वर्षी 4 जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात मान्सून 8 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. सर्वसामान्यपणे मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होत असतो, मात्र, यंदा मान्सून लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, मागील वर्षी एल निनोचा प्रभाव मान्सूनवर होता. तो यंदा कमकुवत झाला आहे. भारतीय उपसागरात आता ला निनो सक्रीय झाला आहे. यामुळे यंदा चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती आहे.
मागील ५ वर्षांची आकडेवारी
मागील ५ वर्षांची आकडेवारी बघितली तर, २०१९ मध्ये ८ जून रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता. २०२० मध्ये १ जूनला मान्सून केरळात,. २०२१ मध्ये ३ जून रोजी मान्सूनचे केरळात आगमन झाले. २०२२ – २९ मे, २०२३ – ८ जून आणि २०२४ मध्ये ३१ मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज आहे.