जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२५ । उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ही आनंदवार्ता आहे. ती म्हणजे दरवर्षीच्या तुलनेत यंदा ८ ते १० दिवस आधीच आगमन होणार आहे. मान्सून १३ मेपर्यंत अंदमनात- निकोबार दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मान्सून दरवर्षी अंदामान-निकोबार बेटावर १८ ते २२ मेच्या सुमारास येतो. पण यावर्षी तो १० दिवस आधीच दाखल होणार आहे. महत्वाचे म्हणजे, अंदमान- निकोबार बेटांवर मान्सूनच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. हवेचे दाब कमी झाल्याने मान्सूच्या हालचालींना वेग आल्याचे सांगण्यात आले आहे. सलग ५० दिवस चाललेल्या उष्णतेचा परिणाम झाल्याने मान्सून यावर्षी १० दिवस आधी अंदमान-निकोबारमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गतवर्षीदेखील १९ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता.
यंदा एल निनोचा प्रभाव नसल्याने आणि ला निना सारख्या अनुकूल वातावरणामुळे पावसाचे प्रमाण चांगले राहील, असे हवामान खात्याने सांगितले. यावर्षी देशामध्ये १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सून अंदमानमध्ये दाखल झाल्यानंतर पुढच्ये ५ ते ६ दिवसांत तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.