⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! विश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, जळगावातही होणार जोरदार पाऊस

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२४ । राज्यात वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनने आठवडाभर विविध ठिकाणी जोरदार हजेरी लावली. मात्र गेल्या ४-५ दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. जळगावातही पावसाने उघडदीप दिल्याचं पाहायला मिळालं. जूनचा पंधरवडा उलटला, तरी पेरण्यायोग्य पावसाने हजेरी लावलेली नाही. शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.अशातच आता पावसाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

आठवडाभराची विश्रांती घेतल्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात मौसमी वारे वाहू लागल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातही तुफान पाऊस होईल, असं सांगण्यात आलं आहे.

मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. गेल्या ४-५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. दरम्यान, आज मंगळवारी आणि उद्या बुधवारी मुंबईसह कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

महाराष्ट्रात पुढील ५ दिवस जोरदार पाऊस
मुंबईसह राज्यातील अनेक भागात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून पुढील ५ दिवसांत मराठवाड्यासह विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसतील. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, अकोला, यवतमाळा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात तुफान पाऊस होईल, असं सांगण्यात आलं आहे.

जळगावातील तापमानात वाढ?
दरम्यान, मागील चार पाच दिवसापासून जळगावातही पावसाने उघडदीप दिल्यामुळे तापमानाचा पारा वाढला होता. जळगावचे तापमान दोन दिवसांपासून पुन्हा ३९ अंशांवर पोहोचले आहे. यामुळे उकाडा वाढल्याने जीवाची लाहीलाही होते आहे. असे असताना सोमवारी सायंकाळी आकाशात पाऊस पाडणाऱ्या ‘निंबस’ ढगांनी दाटी केल्याने दिलासा मिळाला. ढगाळ वातावरणानंतर जिल्ह्यातील काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. त्यांनतर आज मंगळवारी जोरदार पावसाची शक्यता आहे.

चांगला पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी
दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेती कामांना वेग आला आहे. शेतकरी खरीपाच्या पेरणीच्या तयारीत आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात देखील केली आहे. दरम्यान, अनेक भागात चांगला पाऊस झाला नाही, त्या भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 100 मिलीमीटर पााऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असं आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.