देशमुख, मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा नंबर ; भाजप नेत्याच्या ट्विटने खळबळ
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२२ । सध्या राज्यात ईडी (ED) अॅक्टिव्ह असून आधीच मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे दोन मोठे नेते तुरुंगात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचा आणखी एक मोठा नेता लवकरच मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार असल्याचे ट्विट भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
“माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!”, असं सूचक इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय. त्यांच्या या ट्विटने जेलमध्ये जाणारा राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण असा प्रश्न चर्चेत आला आहे. तर दुसरीकडे पुढे घडणाऱ्या घडामोडी कंबोज यांना आधीच कश्या माहिती होतात असा प्रश्न विचारला जातोय.
दरम्यान, याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा पर्दाफाश करणार असल्याचंही मोहित कंबोज म्हणाले आहे. “भारत आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, गर्ल फ्रेंड्सच्या नावावरील संपत्ती, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी,” या गोष्टींचा पर्दाफाश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
तिसरा नेता कोण?
मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण? असा प्रश्न चर्चेत आला आहे. राष्ट्रावादीतील काही नेत्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे. खुद्द शरद पवार यांच्यासह अजित पवारांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. तर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचीही सीजे हाऊसमधील पुनर्बांधणी प्रकरणी चौकशी सुरू आहे. पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता राजकीय वर्तुळात प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. कंबोज सुचवू पाहणारे ‘राष्ट्रवादीचे मोठे नेते’ प्रफुल्ल पटेलच असल्याची जोरदार चर्चा आहे.