जळगाव लाईव्ह न्यूज | २८ जुलै २०२३ | जळगाव शहराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून १५ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला असून या निधीतून शहरातील रस्ते, गटारी, स्मशानभुमी सुधारणा, पथदिवे व उद्यान विकासाची कामे करण्यात येणार आहेत.
शहराच्या विकासाठी आवश्यक निधीसाठी सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे, आज मिळालेला निधी त्याचाच भाग आहे. आतापर्यंत सरकारकडे जे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यास टप्प्या टप्प्याने मंजूरी मिळत आहे. उर्वरित कामांसाठीही पाठपुरावा सुरु आहे. येणाऱ्या काळात अजून भरघोस निधी मिळेल, असा विश्वास आमदार राजूमामा भोळे यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलतांना व्यक्त केला.
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात जळगाव शहरासाठी भरघोस निधीचा पाऊस जळगाव शहरात पडला आहे. आमदार राजूमामा भोळे यांनी शहराच्या विकासासाठी निधीची मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्यास यश मिळाले आहे. शहराच्या विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आधी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चित्रा चौक रस्त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यानंतर आज अतिरिक्त १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रस्ते व गटारींसाठी ७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासह शहरातील उद्याने विकसित करण्यासाठी दीड कोटी, पथदिव्यांसाठी ७५ लाख व स्मशानभुमी दुरुस्तीसाठी ७५ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.