जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२३ । शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचा होम पीच असलेल्या ठिकाणी म्हणजेच पाचोरामध्ये आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर जळगावातील राजकारण चांगलंच तापलं असून राजकीय हल्ले-प्रतिहल्ले केले जात आहे. अशातच आता आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.
काय म्हणाले आ. किशोर पाटील?
उद्धव ठाकरे म्हणतात माझा बाप चोरला… माझा बाप चोरला म्हणत असतात. अरे बाबा… कुणी चोरला हे माहीत आहे तर पोलिसात तक्रार द्या; अशी खोचक टीका किशोर पाटील यांनी केली आहे. तसेच आज पाचोरा येथे होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेला 25 हजारापेक्षा अधिक लोक जमणार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी जादू नाही असंही ते म्हणाले. पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
आज ते माझ्या काकांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी येत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसह सर्व नेत्यांचं मी स्वागत करेल. या सभेला कोणताही गालबोट लागणार नाही, असं किशोर पाटील यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे यांच्याकडे काही बाळासाहेबांसारखी जादू नाहीये. उद्धव ठाकरेंमध्ये एवढी ताकद असती तर त्यांनी 288 मतदारसंघात सभा घेतल्या असत्या. तसेच सर्वच सभांमधून उमेदवार निवडून आणले असते. असे 50 आणि 50 आमदारांवर ते थांबले नसते. त्यामुळे त्यांच्या इतकी काही जादू नाहीये. त्यांची भाषणं तीच तीच आहेत. माझा बाप चोरला… माझा बाप चोरला. अरे बाबा… बाप चोरला हे माहीत आहे, कुणी चोरला हे माहीत आहे तर पोलीस स्टेशनमध्ये पोलिस ठाण्यात तक्रार द्या ना, असं डिवचतानाच उद्धव ठाकरे यांच्या सभेला 25 हजारापेक्षा जास्त लोक जमणार नाहीत. 25 हजाराच्यावर 26 हजारावी खुर्ची आली तर मी राजकारण सोडून देईल, असंही त्यांनी सांगितलं.