खडसेंना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाले कसे? : गिरीश महाजनांचा सवाल
जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना भाजपचे नेते आ.गिरीश महाजन यांनी खडसे यांनी मिळवलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर शंका उपस्थित केली आहे.
आज जामनेर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांनी खडसे यांचे नाव असलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र दाखवले. याच महिन्यात जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने ६० टक्के अंपगत्वाचे प्रमाणपत्र दिलेले आहे. खडसेंनी स्पाईनचे ऑपरेशन झाले असल्याचे सांगून हे प्रमाणपत्र मिळवले आहे, असा आरोप महाजन यांनी केला. सामान्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खूप खेटे घालावे लागतात. खडसेंनी कुठल्या कारणासाठी असे प्रमाणपत्र मिळवले आहे ? असा प्रश्नही त्यांनी शेवटी उपस्थित केला.
बीएचआर घोटाळा बाहेर काढल्यामुळं आपल्या मागे ईडीचा ससेमिरा लावला गेल्याचा आरोप खडसेंनी केला होता. तो आरोप महाजनांनी खोडून काढला. ‘ईडीची चौकशी ही चार वर्षांपासून पुण्यातील भोसरीतील जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात सुरू आहे आणि बीएचआर प्रकरण हे आता बाहेर निघाले आहे. त्यामुळे बीएचआर गैरव्यवहार आणि खडसेंच्या ईडी चौकशीचा काडीमात्र संबंध नसल्याचेही महाजन यांनी स्पष्ट केले.
‘तुम्ही स्वतःला निर्दोष म्हणता तर मग चौकशीला सामोरे जा. ईडीला आवश्यक ती कागदपत्रे सादर करून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊ द्या ना. कशाला इकडे तिकडे पळत फिरताय, तुम्ही खरोखर निर्दोष असाल तर आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू, असेही महाजन म्हणाले.