जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२४ । आशा वर्कर सेविका बचत गट सीआरपी व गटप्रवर्तक हे विविध जबाबदाऱ्यांस प्रामाणिकपणे काम करीत असून त्यांच्या मेहनतीमुळे आज अनेक घरे आरोग्यदायी लहान मुले शिक्षणाच्या प्रवाहात येऊन अनेक महिला स्वावलंबी म्हणत आहे. हे कार्य केवळ स्तुत्यच नाही तर समाजाला सुदृढ आणि सक्षम बनवणारे आहे. सेविका सीआरपी गटप्रवर्तक आणि “आशा” या सामाजिक सुरक्षा जोपासणारे असून विकासाच्या “दिशा” आहेत. महायुती शासनाने महिलांसाठी विविध योजना राबविल्यामुळे समाजात सकारात्मक बदल होत असून खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मान केला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य कृती समिती आयटक अंगणवाडी सेविका यांनी समन्वय व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खा. स्मिताताई वाघ व आ. राजू मामा भोळे यांनी सांगितले की, या महिलांचे कार्य अष्टभुजांप्रमाणे आहेत. त्यांनी या सेविकांच्या योगदानाचे कौतुक करत, त्यांची मेहनत आणि त्याग यामुळे आरोग्य, पोषण, आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडले असल्याचे म्हटले. आपण काम करणाऱ्या भावांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन देखील केले.
यावेळी आशा वर्कर, सीआरपी, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तक व बचत गटाच्या प्रमुख महिलांनी मानधन वाढ केल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिताताई वाघ व आ. राजूमामा भोळे यांचा शाल श्रीफळ व बहिणीं तर्फे भावाला भेट वस्तू देवून भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षिका ज्योती राणे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अंगणवाडी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रेमलता पाटील यांनी मानधन वाढीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिताताई व आ. राजू मामा भोळे केलेल्या पाठपुरावा बद्दल आभार व्यक्त करून कृतज्ञता व समन्वय सोहळ्या बाबत सविस्तर माहिती विशद केली तर प्रतिभा पाटील यांनी मानले.
याप्रसंगी अंगणवाडी, आशा वर्कर, सेविका, सीआरपीच्या प्रेमलाता पाटील, वत्सला पाटील, उषाताई सपकाळे, बेबीताई पाटील, छाया बाविस्कर, कमल माळी, माधुरी चौधरी, लता ठाकरे , छायाताई पाटील, राधाताई धनगर शोभाताई धनगर, चंद्रकला कोळी, देवकीबाई शर्मा, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच डंपी सोनवणे यांच्यासह अशा वर्कर, सीआरपी , अंगणवाडी सेविका , गटप्रवर्तक व बचत गटाच्या प्रमुख महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.