जळगाव जिल्हा

जिल्ह्यातील उद्योगांना वीज-जीएसटी मध्ये सवलतीसाठी शासन स्तरावर प्रयत्नशील; पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्ह्यातील उद्योगांना आवश्यक त्या परवानग्या एकाच छताखाली प्राप्त व्हाव्यात म्हणून 21 कोटी रुपये एवढा निधी ‘उद्योग भवन’ साठी शासनाने मंजूर केला असून त्यात उद्योग व्यवसायाशी संबंधित आस्थापनाचे कार्यालय त्यात असतील असे हे सुसज्ज उद्योग भवन येत्या दोन वर्षात पूर्ण होणार असून जळगाव जिल्ह्यातील उद्योगांना मराठवाडा व विदर्भाच्या धर्तीवर वीज आणि जीएसटी मध्ये सवलत मिळावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ‘इग्नाइट महाराष्ट्र -2024’ ही जळगाव जिल्ह्यातील उद्योजक, नव उद्योजक, उद्योगोत्सुकांसाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली, त्याच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री बोलत होते.

पालकमंत्री यांनी सांगितले की, चाळीसगाव, पाचोरा, व चोपडा येथील ग्रामीण भागातील सहकारी औद्योगिक वसाहतींना पायभूत सुविधासाठी 8 कोटी 71 लाख रुपयाचा निधी शासनाने दिला आहे हे सांगून जिल्ह्यात किमान चार ते पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शासनाच्या उद्योग विभागातर्फे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना शहरी व ग्रामीण भागातील नव उद्योजकांना भरीव अनुदान देण्यात येत असून यातून जिल्ह्यात दरवर्षी एक हजार नवीन उद्योगांची उभारणी होईल ज्यातून जिल्ह्याला किमान तीन हजार युवकांना नवीन रोजगार निर्माण होतील असा शासनाचा प्रयत्न असल्याचेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते 17 ऑगस्टला
महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून पात्र बहिणींना 17 ऑगस्टला त्यांच्या खात्यात आमच्या शासनाकडून 2 हप्ते दिले जाणार आहेत.ती राखी पौर्णिमेची बहिणींना आम्ही दिलेली ओवाळणी असेल असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावांनाही सोडले नसून त्यांच्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ‘ सुरु केली आहे. त्यात 12 वी पास झालेल्यांना 6 हजार, आय. टी. आय, पदविका असणाऱ्यांना 8 हजार तर पदवीधर, पदव्युत्तर असणाऱ्या युवकांना 10 हजार रुपये दिले जाणार आहे. या युवकांना विविध आस्थापनेत प्रशिक्षणासाठी पाठविले जाणार आहे. आपण त्यांना कामासाठी, कौशल्य शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

विमानसेवा सुरु; उद्योगांसाठी पूरक
ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार, आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे आणि रात्री विमान उड्डाणासाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक सोयीसाठी जिल्हा नियोजन मधून निधी दिला त्यामुळे जळगाव वरून आता मुंबई, पुणे, हैद्राबाद, गोवा येथे विमान सेवा सुरु झाली असून उद्योजकांना उद्योगवाढीसाठी अत्यंत पूरक ठरत असल्याचे सांगून जिल्ह्यातील युवकांनी आता अधिकाधिक उद्योग उभारून रोजगार देणारे बनले पाहिजे त्यासाठी शासन आणि प्रशासन तुमच्या पाठीशी असेल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील उद्योग वाढीसाठी, जिल्ह्याचे सकल उत्पन्न ( जीडीपी ) वाढीसाठी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक असल्याचे सांगून जिल्हा प्रशासन त्यासाठी काय काय करत असल्याची माहिती दिली. जिल्ह्याचे आजचे एकूण उत्पन्न 76 हजार कोटी आहे ते 1 हजार कोटी करण्यासाठीचा नियोजन आराखडा सांगितला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ‘लँड बँक ‘ आहे. जिल्ह्यात ‘दाळ मिल ‘, प्लॅस्टिक, शेतीपूरक उद्योगांना मोठा वाव असल्याचे सांगून जिल्ह्यात पिक विम्याचे पिक, फळ विम्याचे 1500 कोटी रुपये आले आहेत. सालगुडी येथे केळीसाठी फिडर करण्याची योजना असून त्यासाठी दर दिवशी 48 टन केळी लागणार आहे. जळगावमध्ये गोल्डन हब बनण्याची क्षमता आहे, आता विमानसेवाही हैद्राबादशी कनेक्ट झाली आहे. त्यामुळे गोल्डन हब होण्यासाठी लागणारी मदत शासन, प्रशासन स्तरावर करता येईल. तसेच आपला जिल्हा कापूस उत्पादनातील महत्वाचा जिल्हा आहे पण हेक्टरी उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे. हेक्टरी उत्पादन 100 क्विंटल होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणे सुरु आहे.अशी अभ्यासपूर्ण मांडणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उद्योजकांना पुढे केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button