जळगाव लाईव्ह न्यूज | 17 फेब्रुवारी 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव जिल्हा दौर्यात जिल्ह्याचा औद्योगिक विकास करण्यासाठी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी चोपडा, एरंडोल, धरणगाव, पाचोरा व मुक्ताईनगर या पाच तालुक्यात औद्योगिक वसाहत स्थापन करण्याची घोषणा केली. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने या घोषणेचे स्वागतच करायला हवे. जर पाचही तालुक्यांमध्ये एमआयडीसी सुरु झाल्या तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, शिवाय जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल. मात्र त्यासाठी ही घोषणा केवळ कागदावरच रहायला नको. आधीही जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक घोषणा झाल्या आहेत मात्र त्या गाजर ठरल्या आहेत. यामुळे पाच तालुक्याच्या एमआयडीसीची घोषणा जामनेर तालुक्यातील टेक्सटाईल पार्कसारखी ठरु नये, अशी जिल्हावासियांची अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. त्यांच्या मुख्यमंत्री पदाची भविष्यवाणी पाचोरा येथेच झाल्याची चर्चा जिल्ह्यात अधूनमधून रंगत असते. शिवाय जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व आमदार शिंदे यांच्या गटात आहेत. यामुळे जळगाव जिल्ह्याचा सर्वाधिक दौरा करणारे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव घ्यावे लागेल, असे सध्याचे चित्र आहे. नुकताच त्यांनी जळगाव दौरा केला. या दौर्यात त्यांनी खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार तीन जिल्ह्यासाठी अमरावतीच्या धर्तीवर जळगाव येथे विभागीय कार्यालय सुरू करण्यासह चोपडा, धरणगाव, पाचोरा, मुक्ताईनगर, एरंडोल येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.
जळगाव जिल्ह्याचे मुख्य पीक केळी असल्याचा उल्लेख करून मुख्ममंत्री म्हणाले, केळी पिकावर आधारित उद्योगासाठी आपले प्रयत्न राहणार आहे. केळीच्या खोडापासून कापड बनविण्याच्या उद्योगासाठी बाराशे कोटी रुपयांची मंजूरी देण्यात आली असून त्यांचे कामही सुरू झाले आहे. पोषण आहारात केळीच्या समावेशासाठीही प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे जिल्ह्याचा औद्योगिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र हे करत असतांना मुख्यमंत्र्यांनी जळगावच्या सध्याच्या एमआयडीच्या दुर्देशेकडेही लक्ष द्यावे, अशी उद्योजकांची अपेक्षा आहे. शिवाय जामनेरच्या टेक्सटाईल पार्कसारखी ही घोषणा हवेतच विरु नये, अशीही रास्त अपेक्षा आहे.
राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना जामनेर येथे टेक्सटाईल पार्कची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेला वर्षे उलटली तरी कोणत्याही कामाला सुरुवात होत नव्हती. मात्र गेल्या वर्षी जामनेर तालुक्यातील भुसावळ रस्त्यावरील गारखेडा आणि होळ हवेली या गावांमध्ये जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र पाच वर्ष उलटल्यानंतरही अद्यापही टेक्सटाईल पार्क म्हणजे, जळगाव जिल्हावासियांसाठी एक स्वप्नच आहे.