⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

जळगावमध्ये होतेयं ‘मेडिकल हब’; अशी आहे सर्व पॅथींची महाविद्यालये आणि प्रवेश क्षमता

जळगाव लाईव्ह न्यूज | १३ मार्च २०२३ | शैक्षणिक क्षेत्रात जळगाव जिल्ह्याची घोडदौड सुरु आहे. आजमितीस जळगाव जिल्ह्यात मेडिकल, इंजिनियरिंग, मॅनेजमेंटपासून सर्वच अभ्यासक्रमांचे महाविद्यालये व शैक्षणिक संस्था आहेत. मात्र आता जळगाव जिल्ह्यात वैद्यकिय शिक्षणासाठी नवे दरवाजे खुले होणार आहेत. जळगावमध्ये ‘मेडिकल हब’ची उभारणी होत असून यात वैद्यकिय शिक्षणाच्या सर्वच शाखांमध्ये प्रवेश घेण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. यासाठी ७०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून पाच हजार कोटींचे कर्ज घेण्यात येणार आहे.

जळगाव ते औरंगाबाद रस्त्यावर जळगावपासून पाच कि.मी. अंतरावरील चिंचोली येथे हे मेडिकल हब उभारले जाणार आहे. या ठिकाणी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे दंत चिकित्सा महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे राज्यातील पहिले शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आणि ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे फिजिओथेरेपी महाविद्यालय प्रस्तावित आहे. या मेडिकल हबमुळे सर्व प्रकारच्या सुविधा व सर्व पॅथी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

जळगावमध्ये ‘मेडिकल हब’ उभारण्याची घोेषणा एप्रिल २०१७ मध्ये झाली होती. मात्र तेंव्हापासून हे काम थंडबस्त्यात होते. आता मेडिकल हबच्या कामाने गती घेतली आहे. ‘मेडिकल हब’साठी निविदा प्रक्रिया अखेर पूर्ण होऊन कार्यादेशदेखील देण्यात आले आहेत. येत्या दोन आठवड्यात या कामाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. या मेडिकल हबमुळे जळगावच्या शैक्षणिक क्षेत्रात नवी क्रांती होईल, अशी अपेक्षा आहे.

जळगाव येथे उभारण्यात येणार्‍या वैद्यकीय संकुलाच्या कामाचे कार्यादेश दिले गेले असून ७०० कोटी रुपयांचा निधीदेखील संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. सर्व प्रकारच्या सुविधा व सर्व पॅथी एकाच ठिकाणी असलेल्या या संकुलासाठी व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या इतर ठिकाणच्या कामासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून पाच हजार कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे.