पावसाचा खंड पडल्यास खरीप पिकांसाठी ‘या’ उपाययोजना कराव्या..

ऑगस्ट 14, 2025 6:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत खरीप हंगामात पावसाचा खंड पडण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत पिकांचे संरक्षण, जमिनीतील ओलावा टिकविणे आणि उत्पादनाचे नुकसान कमी करणे अत्यावश्यक ठरते. कृषी विभागाच्या शिफारशींनुसार शेतकऱ्यांनी खालील उपाययोजना कराव्यात.

pik

सर्वसाधारण उपाययोजना

पिकांच्या फुलोरा, दाणे भरणे किंवा शेंगा भरणेच्या टप्प्यावर पुरक सिंचन द्यावे. जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी मल्चिंगसारख्या आच्छादन तंत्राचा वापर करावा. पेरणीनंतर जिथे रोपे दाट असतील, तिथे विरळणी करावी. ओलावा टिकविण्यासाठी कोळपणी करून मातीची भर द्यावी. पाणी उपलब्ध असल्यास सकाळी किंवा संध्याकाळी तुषार सिंचन करावे.

सोयाबीन, मूग, उडीद यांसारख्या कमी अंतरावरील पिकांमध्ये लागवडीनंतर ३०–३५ दिवसांनी आंतरमशागती करून प्रत्येक चार ओळींनंतर उथळ सरी करावी. पिकांचे नियमित निरीक्षण करून किडरोग दिसल्यास तत्काळ उपाययोजना करावी. पावसाचा ताण पडल्यास २% युरिया किंवा डीएपी द्रावणाची फवारणी करावी.

फळबागांसाठी

झाडाच्या बुंध्याभोवती वाळलेले गवत, धसकटे, पालापाचोळा यांचे आच्छादन करावे. पाण्याचा ताण कमी करण्यासाठी केओलीन ८% किंवा पोटॅशियम नायट्रेट १–२% फवारावे. रोग प्रतिबंधासाठी १% बोर्डो मिश्रणाची फवारणी व १०% बोर्डोपेस्ट खोडांवर लावावे.

कापूस पिकासाठी विशेष उपाय

पावसाचा खंड पडल्यास ठिबक सिंचनाचा वापर करावा. ठिबक सुविधा नसल्यास एक सरी आड सरी पाणी द्यावे. जमिनीची जलधारण क्षमता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा. कोळपणी करून भेगा बुजवाव्यात. ओलावा टिकवण्यासाठी शेतातील काडी-कचरा किंवा गवत ओळींमध्ये ठेवावे.

पानांचे तापमान वाढल्यास २% युरिया किंवा १% पोटॅशियम नायट्रेट फवारणी करावी. बाष्पीभवन कमी करण्यासाठी ८% केओलीन किंवा खडू पावडर फवारणी करावी. पिकातील अतिरिक्त गळ फांद्या आणि खालची पाने काढून टाकावीत, ज्यामुळे ओलावा टिकतो आणि पाण्याची स्पर्धा कमी होते.

तुर, सोयाबीन व मका

पाणी उपलब्ध असल्यास संरक्षित पाणी द्यावे. पाणी उपलब्ध नसल्यास २% युरिया किंवा पोटॅशियम नायट्रेट फवारावे. ओलावा टिकवण्यासाठी कोळपणी करावी. उष्णतेमुळे बाष्पीभवन कमी करण्यासाठी ६–८% केओलीनची पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. आच्छादनासाठी पाचट, वाळलेले गवत यांचा वापर करावा.

पावसाचा खंड पडल्यास त्वरित व योग्य उपाययोजना केल्यास खरीप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर टाळता येते. जमिनीतील ओलावा संवर्धन, संरक्षित पाणीपुरवठा, सेंद्रिय पदार्थांचा वापर आणि पानांवरील वाष्परोधक फवारणी या तंत्रांचा अवलंब केल्यास पिके ताण सहन करून उत्पादन देऊ शकतात.

( संकलन :- जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव )

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now