जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहर मनपाच्या महापौर जयश्री महाजन यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जळगाव ग्रामीणचा दौरा सुरु केला आहे. सलग तिसऱ्या दिवशी त्यांनी कानळदा आणि कडगाव येथे समाजबांधवांची भेट घेत संवाद साधला. तसेच जयंती उत्सव साजरा करीत असल्याने २५ हजारांची देणगी देखील महापौर जयश्री महाजन यांनी दिली.
जळगाव शहर मनपाच्या महापौर जयश्री महाजन यांनी आपला मोर्चा जळगाव ग्रामीणकडे वळवला आहे. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधत महापौर जयश्री महाजन जळगाव ग्रामीणचा दौरा करीत आहेत. दोन दिवस विविध गावातील समाजबांधवांशी चर्चा केल्यानंतर रविवारी त्यांनी कानळदा आणि कडगाव येथे भेट देत संवाद साधला.
शुक्रवारी महापौर जयश्री महाजन यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघातील लेवा पाटील समाज बहुल भादली, नशिराबाद, जळगाव खुर्द या गावांना भेट देत समाजबांधवांशी चर्चा केली होती. शनिवारी महापौरांनी असोदा व शेळगाव गावी समाजाच्या जेष्ठ सदस्यांसह सर्व समाज बांधवांशी चर्चा केली. रविवारी महापौरांनी कानळदा आणि कडगाव येथे भेट देत, कोरोनाची मरगळ दूर झाल्याने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती गावागावात जल्लोषात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
गावागावात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करीत जळगाव शहरात आयोजित कार्यक्रम आणि मिरवणुकीत देखील समाज बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले. प्रसंगी अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक संघाचे प्रदीप (बंडू) भोळे, लेवा महासंघ प्रदेश सदस्य प्रदीप रोटे, मधुकर भंगाळे, निखिल रडे, सुरेश फालक आदींसह इतर समाज बांधव उपस्थित होते.
उद्या दि.३१ रोजी जळगाव शहरात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सर्व समाजबांधवांनी मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे.