⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

महापौरांच्या जळगाव ग्रामीण दौऱ्याला सुरुवात, समाजबांधवांना केले आवाहन!

जयंती उत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक गावाला २५ हजारांची देणगी, शहरात भव्य मिरवणूक

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहर मनपाच्या महापौर जयश्री महाजन यांनी जळगाव ग्रामीणचा दौरा सुरू केला आहे. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी त्यांनी समाजबांधवांना आवाहन केले. तसेच जळगाव ग्रामीणमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव साजरा करणाऱ्या गावाला प्रत्येकी २५ हजार रुपये देणगी देखील महापौरांनी दिली.

जळगाव शहर मनपाच्या महापौर जयश्री महाजन या महापौर म्हणून दिवसभर मनपात बसून येणाऱ्या जळगावकरांच्या समस्या जाणून घेत असतात. गेल्या वर्षभराचा प्रवास लक्षात घेता महापौर जयश्री महाजन या राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. महापौर पदाची मोठी मजल मारताना स्थानिक नेत्यांना बाजूला ठेवत त्यांनी थेट पक्षप्रमुखांच्या माध्यमातून बाजी मारली होती. नगरसेविका ते महापौर हा प्रवास पूर्ण करत असतानाच त्यांची वर्णी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालिका म्हणून तर ग.स. सोसायटीमध्ये तज्ञ संचालिका म्हणून लागलेली आहे.

जळगाव शहरात महापौर म्हणून कार्यरत असताना त्यांनी आपला मोर्चा जळगाव ग्रामीणकडे वळवला आहे. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती दोन दिवसावर आली असून जयंतीचे औचित्य साधत महापौर जयश्री महाजन जळगाव ग्रामीणचा दौरा करीत आहेत.

शुक्रवारी महापौर जयश्री महाजन यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघातील लेवा पाटील समाज बहुल भादली, नशिराबाद, जळगाव खुर्द या गावांना भेट देत समाजबांधवांशी चर्चा केली. कोरोनाची मरगळ दूर झाल्याने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती गावागावात जल्लोषात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच समाज संघटन, रोजगार, वधुवर मेळावा यासंदर्भात देखील महापौर जयश्री महाजन यांनी संवाद साधला.

गावागावात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करीत जळगाव शहरात आयोजित कार्यक्रम आणि मिरवणुकीत देखील समाज बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले. भादली हे जयश्री महाजन यांचे माहेर असल्याने गावात त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. गावातील हनुमान मंदिरासाठी मदत म्हणून त्यांनी २१ हजारांची देणगी देखील यावेळी दिली. प्रसंगी अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक संघाचे प्रदीप (बंडू) भोळे, लेवा महासंघ प्रदेश सदस्य प्रदीप रोटे, निखिल रडे, सुरेश फालक आदींसह इतर समाज बांधव उपस्थित होते.