मविप्र वाद : भोईटेंच्या घरावर पुन्हा दगडफेक, तिघांविरुद्ध गुन्हा
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२१ । जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादातून पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आहे. जयवंत भोईटे यांच्या घरावर दगडफेक करून त्यांना धमकविण्यात आल्याप्रकरणी तालुका पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुना निमखेडी रस्त्यावर असलेल्या कांताई नेत्रालयाच्या मागील बाजूस मविप्रचे संचालक जयवंत बाबुराव भोईटे हे परिवारासह राहतात. मविप्रच्या वादामुळे जयवंत भोईटे यांच्यावर आजवर दोन वेळा हल्ला करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री १०.१५ च्या सुमारास भोईटे हे घराच्या कंपाउंडला कुलूप लावून घरात आराम करत बसले होते.
अचानक त्यांना घरावर कुणीतरी दगड फेकत असल्याचे जाणवल्याने भोईटे यांनी खिडकीतून डोकावून पाहिले. कल्पेश संभाजी भोईटे, प्रशांत विलास भोईटे, हेमंत जयवंत येवले हे दगडफेक करताना दिसून आले. जयवंत भोईटे यांनी जाब विचारला असता ते तिघे कंपाउंड गेटवरून उडी मारत आत आले आणि निलेश भाऊने तुला शेवटची ताकीद दिली आहे असे धमकावले. आवाज ऐकून शेजारील एक महिला बाहेर आली असता हल्लेखोरांनी त्यांना देखील धमकावले. यावेळी हल्लेखोरांनी लाकडी दांड्याने दुचाकीचे देखील नुकसान केले. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार हरीलाल पाटील करीत आहे.