⁠ 
शनिवार, मे 4, 2024

बाजारपेठ पोलिसांकडून दोन चोरट्यांना अटक; चार दुचाकी जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । दोन अट्टल दुचाकी चोरट्यांना भुसावळ बाजारपेठ पोलिसांकडून अटक करण्यात आली असून या दोनही चोरट्यांकडून ४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या दुचाकी चोरट्यांना अधिक तपासासाठी जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

भुसावळ शहरासह जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले होते. दरम्यान, दुचाकी चोरट्यांबाबत पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून अभिषेक उर्फ निक्की नंदलाल मिश्रा (वय-१९, रा.गांधीनगर, भुसावळ) व निखील जितेंद्र ठाकरे (वय-२१, रा. नारायण नगर, लोणारी हॉलजवळ, भुसावळ) यांना अटक केली. दरम्यान, त्यांच्याकडून ८३ हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जळगाव एमआयडीसी, फैजपूर, चोपडा आदी ठिकाणाहून या चोरटयांनी दुचाकी लंपास केल्या आहेत. अधिक तपासासाठी दोनही चोरट्यांना जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई
सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ, हवालदार रवींद्र बिर्‍हाडे, पो.ना. विकास सातदिवे, उमाकांत पाटील, निलेश चौधरी, रमण सुरळकर, हेको. प्रशांत सोनार, प्रशांत परदेशी, ईश्‍वर भालेराव, योगेश माळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.