जळगाव लाईव्ह न्यूज | २७ मार्च २०२३ | जळगाव जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. जिल्ह्यात ६ बाजार समित्यांसाठी २८ तर उर्वरित ६ बाजार समितीसाठी ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांसाठी युती, आघाड्यांची चर्चा असली तरी राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, भाजप या पक्षाच्या सर्वच कार्यकत्यांनी या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. प्रत्येक पक्षात इच्छुकांची मोठी भाऊगर्दी असल्याने पक्षाने स्बळावरच निवडणुका लढाव्यात, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याबाबत नेत्यांनी अद्याप पत्ते उघड केले नसले तरी भाजप-शिंदे गट युतीसाठी आग्रही आहे. यामुळे मतदारांमध्ये चांगला संदेश जाईल, असे नेत्यांचे मत आहे.
जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या संचालकांचा कार्यकाळ २०२० मध्येच संपला होता. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजार समितीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. दरम्यान, गेल्या वर्षी देखील कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र सोसायट्यांच्या निवडणुका न झाल्यामुळे निवडणूक कार्यक्रम रद्द झाला. १२ बाजार समित्यांमध्ये जामनेर, रावेर, चाळीसगाव, पारोळा, चोपडा, भुसावळ. जळगाव, यावल, अमळनेर, धरणगाव, पाचोरा, बोदवड या समित्यांचा समावेश आहे.
राज्यात राजकीय समीकरणे बदलल्यामुळे मतदारांचा कल नेमका कुणाकडे असेल? याचे चित्र कोणत्याही पक्षाला अद्यापतरी स्पष्ट नाही. यामुळे सर्वच पक्षांचे नेते सावध भुमिका घेतांना दिसत आहेत. शिंदे-फडणवीस ही जोडी किती भक्कम आहे, हे दाखविण्यासाठी आगामी सर्वच निवडणुका एकत्र लढण्याचा कल दोन्ही पक्षांमध्ये दिसत असला तरी स्थानिक पातळीवरचे नेते आणि कार्यकर्त्यांची भुमिका यावरच पुढचे चित्र अवलंबून आहे. राज्यात जरी युती-आघाडी करून नेते आपले राजकारण करत असले जिल्ह्यातील कार्यकर्ते मात्र स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.
जिल्ह्यात जरी १२ बाजार समित्यांसाठी निवडणूक होणार असली तरी जिल्ह्याचे लक्ष मात्र जळगाव व धरणगाव बाजार समितीकडे लागले आहे. या दोन्ही बाजार समितीसाठी आजी माजी पालकमंत्र्यांचे पॅनल आमने-सामने होणार आहे. त्यात भाजपने देखील स्वबळाचा नारा दिल्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या दोन्ही बाजार समित्यांच्या निवडणुकांकडे लागून आहे.