जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२५ । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नसून अशातच जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही भाजपची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जळगावात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे.

शरद पवार गटाच्या जळगाव जि. प. माजी सदस्य संभाजी पाटील, डी. पी. साळुंखे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी भाजपाची साथ देण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचा भाजप कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी सर्वांचे स्वागत केले.

दुसरीकडे शरद पवार गटाच्या चोपडा पंचायत समिती माजी सभापती भरत पाटील, गोपाल महाजन, राजेंद्र पाटील, अनिल पाटील, अशोक पाटील, अनिल महाजन आदींनी तसेच आदिवासी भिल्ल समाजातील राहुल दळवी, काशिनाथ दळवी, आकाश दळवी, अंकुश दळवी, संदीप दळवी आदी असंख्य कार्यकर्त्यांनी राहुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.








