⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

मनीचा नाद भाेवला : उच्चशिक्षित विद्यार्थी निघाले माेबाइल चाेर

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । शहरातील सिंधी कॉलनी ते गणेश कॉलनी या तीन किमीच्या रपेटमध्ये दोन दुचाकीस्वारांनी तीन जणांच्या हातातून मोबाइल लांबविल्याची घटना रविवारी रात्री ७.३० वाजता घडल्या. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर सोमवारी रात्री पोलिसांनी दोन चोरटे पकडले. त्यात एक अभियांत्रिकीचा तर दुसरा पदवीच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. मंगळवारी दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सविस्तर असे की, आकाश संजय पाटील (वय १८, रा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे) व गणेश राजेंद्र शिंदे (वय १८, रा. वाघनगर) अशी चोरट्यांची नावे आहेत. या दोघांनी सिंधी कॉलनीतील गायत्री आडवाणी, हितेश प्रशांत बऱ्हाटे व अल्पवयीन मुलगा अशा तिघांच्या हातातून मोबाइल हिसकावले होते. त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद व चोरट्यांचे वर्णन सांगितले. त्यानुसार निरीक्षक रामदास वाकोडे, उपनिरीक्षक प्रदीप चंदेलकर व पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले. मिळालेल्या माहितीच्या अधारे सोमवारी रात्री आकाश व गणेश या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

आकाशने अभियांत्रिकीचे तर गणेश प्रथम वर्षाचे शिक्षण घेतो आहे. इझी मनीच्या नादी लागून त्यांनी चोरीची वाट धरल्याचे तपासात समोर आले. मंगळवारी दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.